अकोला : ‘खासदार सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळांचाच होता. मात्र, त्यापुढचे जे पाऊल त्यांच्या व इतरांच्या मनात होते, ते आम्हाला मान्य नव्हते. भाजपसोबत जाण्याला आमची कधीही सहमती नव्हती’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. अजित पवार मुख्यमंत्री होणे, हे एक स्वप्न आहे, ती काही घडणारी गोष्टी नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.
अकोला दौऱ्यावर असतांना शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव काही लोकांनी मांडला असला तरी त्यासाठी त्या स्वत: इच्छूक नव्हत्या. हा आमचा प्रस्ताव सुद्धा नव्हता. त्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. देशात भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र करण्याची ‘इंडिया’ आघाडीची भूमिका आहे. वंचितची ‘इंडिया’ आघाडीमध्ये समावेशावर प्रकाश आंबेडकरांसोबत काही चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरेंसोबत त्यांची चर्चा झाली. त्यांना सोबत घेण्याचा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमताने निर्णय होईल, असे शरद पवार म्हणाले. सध्या सत्ताधाऱ्यांविरोधातील वातावरण आहे. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे राज्य पुन्हा येऊ शकते. देशातील चित्र देखील भाजपच्या विरोधातील आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपचे अस्तित्व नाही. ७० टक्के भागात भाजप नाही. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “सत्ताधाऱ्यांकडून शेतकरी, कष्टकऱ्यांना नव्हे तर कर्जबुडव्यांना कर्जमाफी”, शरद पवार यांचे सरकारवर टीकास्र
खासगी कंपन्यांच्या हातात शाळा दिल्यावर त्याठिकाणी गौतमी पाटील यांचे नृत्य होणार असेल तर त्याचे काय गंभीर परिणाम होतील, हे दिसत आहे. शैक्षणिक संस्थांचे पावित्र्य अबाधित ठेवले पाहिजे. पोलिसांसह इतर विभागातील कंत्राटी पदभरती देखील अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.अनिल देशमुख, डॉ. संतोष कोरपे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे उपस्थित होते.
हेही वाचा : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ‘मिथेन’चे साठे; पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सर्वेक्षणात…
राष्ट्रवादीत फूट पडलेलीच नाही
राष्ट्रवादीतील फुटीच्या प्रश्नावर शरद पवार यांनी पक्षात फूट पडलेलीच नसल्याचा पुनरुच्चार केला. ‘राष्ट्रवादीत फूट पडलेलीच नाही, तर केवळ काही नेते व आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. आजही आमचे तेच म्हणणे आहे. निवडणूक आयोग व न्यायालयात देखील आम्ही हीच भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.
‘इंडिया’चा पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही
लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्यावतीने पंतप्रधान पदासाठीचा चेहरा देण्याची आवश्यकता नाही. १९७७ साली निवडणुकीत कुणी चेहरा नव्हता. परिवर्तन पाहिजे ही भावना लोकांमध्ये होती. आता देखील देशाील लोकांमध्ये आम्हाला भाजपची सत्ता नको, पर्याय हवा आहे, ही भावना आहे, असे शरद पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.