अकोला : शहराजवळील आखातवाडा तलावावर ‘कलहंस’ युगूलाचे दर्शन घडले असून पक्षीमित्रांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. विदेशी पाहुण्या पक्ष्यांची संख्या यंदा घटल्याचे निरीक्षण ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी नोंदवले आहे. अनकवाडी गावातील आखातवाडा जलाशयात अनेकविध प्रजातीचे पक्षी स्वछंद विहार करीत असतात. पक्षांशिवाय हिवाळी स्थलांतरीत पाहुणे पक्षीही येथे दाखल होतात. परदेशी पक्षी येथे अल्पकाळासाठी मुक्कामी असतात. यावर्षी जानेवारी महिना अर्धा झाला तरी थंडीचा अद्यापही हवा तसा जोर नाही. हिवाळी पाहुण्यांनी हजेरी लावलेली नाही. किरकोळ संख्येत विदेशी पक्षी दाखल झाले आहेत.
हेही वाचा : नितीन गडकरी, मोहन भागवत यांना ट्रान्सपोर्ट मालक साकडे घालणार !
दरवर्षी ‘कांड्या करकोच्या’च्या बरोबर ‘पट्टकदम्ब’ हे पक्षी गेल्या तीन चार वर्षांपासून आखातवाडा तलाव परिसरात थव्यात येतात. त्यांच्या थव्यात एखादा भरकटलेला ‘कलहंस’ पक्षीमित्रांच्या नजरेत येतो. यावर्षी ‘कांडे करकोचे’, ‘पट्टकदंब’ हे पक्षी तलावावर आलेली नाही. ज्येष्ठपक्षी मित्र दीपक जोशी, श्रीकांत वांगे पक्षीदर्शनासाठी गेले असता त्यांना ‘कलहंस’ पक्षाचे युगुल जलाशयात विहार करतांना आढळले. त्यांनी लगेच युगुलाला आपल्या कॅमेरामध्ये कैद केले.
हेही वाचा : संमेलनाला दोन कोटी, तरी पैशांसाठी पदर! शासकीय निधी अद्याप महामंडळाच्याच ताब्यात
‘हंस’ हा शब्द वैदिक काळापासून प्रचलित आहे. महाहंस हे पक्षी काश्मिर, कैलाश, मानसरोवर आदी अतिथंड प्रदेशात आढळतात. पट्ट कदंब वर्गातील बदके हिमालयाच्या पायथ्याशी तसेच गंगेच्या काठावर मोठ्या संख्येने आढळतात, अशी माहिती देऊन कलहंस निरीक्षण अकोलेकरांनी करावे, असे आवाहन ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी केले.