अकोला : उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा रेल्वेचा सर्वात जवळील मार्गातील प्रमुख टप्पा असलेला अकोला-पूर्णा रेल्वे मार्ग दुर्लक्षित राहिला आहे. या मार्गाच्या ब्रॉडगेजचे काम पूर्ण होऊन १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून या काळात मार्गावरून २३ गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दैनंदिन धावणाऱ्या केवळ चार गाड्यांचा समावेश आहे. या मार्गावरील मागण्या व समस्या ‘जैसे थे’ असून मार्ग अद्यापही उपेक्षितच ठरला. मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या अकोला रेल्वे स्थानकाचा भारतात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पहिल्या १०० स्थानकांमध्ये समावेश आहे. अकोला स्थानकाहून दक्षिण मध्य रेल्वेचा हैद्राबाद – अजमेर मार्ग सुद्धा जोडला गेला. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा देशातील हा सर्वात जवळचा मार्ग आहे. भारतातील रेल्वे मार्गांचा विकास करण्यांतर्गत अकोला – पूर्णा व अकोला – अकोट मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यात आले.
हेही वाचा : शासन आपल्या दारी नुसता फार्स; वृद्ध महिलेची दाखल्यासाठी पायपीट
अकोट ते खंडवापर्यंतच्या ब्रॉडगेजचे काम सुमारे दशकभरापासून रखडले आहे. अकोला – पूर्णा ब्रॉडगेज मार्गाचे काम पूर्ण झाल्याने नोव्हेंबर २००८ मध्ये पॅसेंजर गाडी या मार्गावर धावली होती. अकोला – पूर्णा मार्गावर एक हमसफर, सात सुपरफास्ट, नऊ एक्सप्रेस, पाच साप्ताहिक उत्सव विशेष, एक पॅसेंजर अशा एकूण २३ गाड्या १५ वर्षांत सुरू झाल्या आहेत. शेवटची नियमित हमसफर रेल्वे ०५ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू झाली. या मार्गावरून दैनंदिन रेल्वेची संख्या केवळ चार आहे. ब्रॉडगेज झाल्यानंतर या मार्गाचा विकास होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र, हा मार्ग जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवल्याचा आरोप होत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि रेल्वे प्रवासी संघटनांच्या विविध मागण्या असतांना सुद्धा या मार्गाचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : पुण्याचे दोघे ‘कट्टा’ खरेदीसाठी जळगावात आले, मात्र भाव करताना पकडले गेले; कट्ट्यासह काडतुसे जप्त
अकोला – पूर्णा मार्गाचे विद्युतीकरणाचे काम आऊटरपर्यंत झाले. या मार्गावर पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. अकोला स्थानकांवर ‘पीट लाईन’ बनवल्यास अधिक सोयीस्कर होईल. नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचा अकोला स्थानकापर्यंत विस्तार करण्यात यावा, उत्सव विशेष साप्ताहिक सुरू असलेल्या रेल्वेना नियमित करून विशेष भाडे कमी करावे, दक्षिण मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, अजनी – एलटीटी मुंबई एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी, हैद्राबाद – नागपूर – इटारसी व मिरज – पुणे – भुसावळ मार्गे साप्ताहिक धावणाऱ्या रेल्वे हैद्राबाद – अकोला – खांडवा मार्ग सुरू कराव्या आदी मागण्या रेल्वे प्रवासी संघटनांनी केल्या आहेत.
“दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर नांदेड – मुंबई नियमित रेल्वे सुरू करावी. मध्य व दक्षिण मध्य रेल्वे फलाट जोडणी पूर्ण करून उत्तर – दक्षिण जाणाऱ्या रेल्वे फलाट ४, ५, ६ वर उभ्या कराव्यात. अकोला इंटरसिटी एक्सप्रेसचा खंडव्यापर्यंत विस्तार करण्याची आवश्यकता आहे.” – ॲड. अमोल इंगळे, रेल्वे प्रवासी संघटना, अकोला.