अकोला : जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना सखी केंद्राचा आधार मिळत आहे. शहरात सुरू करण्यात आलेल्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’कडून आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत पुरविण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरील महिलांचा सुद्धा समावेश आहे. समाजात अनेकवेळा महिलांवर अन्याय, अत्याचार होत असल्याचे आढळून येते. या संकटग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी महिला व बाल विकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटर चालवले जाते. त्याद्वारे कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, लैंगिक छळ, ॲसिड हल्ला, बाल अत्याचार, बालविवाह, अनैतिक वाहतूक, अपहरण, सायबर गुन्हा व इतर कोणत्याही प्रकारे अत्याचारग्रस्त महिलांना मदत दिली जाते. त्यात केंद्राद्वारे समुपदेशन, कायदेविषयक मार्गदर्शन, पोलीस मदत, वैद्यकीय मदत व पाच दिवसीय तात्पुरता निवारा देण्यात येतो. जिल्हा स्त्री रुग्णालयात वॉर्ड क्र. सातमध्ये सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित केले आहे.
केंद्राद्वारे आजपर्यंत अनेक कुटुंबांना समुपदेशनाद्वारे वेगळे होण्यापासून वाचविण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचारांतर्गत प्रत्येक महिलेला विश्वासाचा आधार देत तिला संरक्षण देऊन तिला हक्काने तिच्याच कुटुंबासोबत राहण्याची व्यवस्था केंद्राद्वारे केली जाते. एक जवळची मैत्रीण म्हणून सखी केंद्र त्या प्रत्येक महिलेच्या जीवनाचा हिस्सा बनते. केंद्राकडून संकटग्रस्त महिलेशी सातत्याने संपर्क राखला जातो. वेळ प्रसंगी केंद्राचे कर्मचारी महिलांच्या घरी जाऊन सुद्धा मदतीचा हात पुरवितात. महिला व बाल विकास विभागाकडून अकोला जिल्ह्यात महिलांचे हित व संरक्षणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सखी केंद्राची मदत मिळवण्यासाठी १८१ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित आहे. संकटग्रस्त महिलांनी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे. “महिला-भगिनींनी अन्याय सहन न करता त्याविरोधात खंबीरपणे उभे राहावे. कुठल्याही संकटात न घाबरता निर्भिडपणे तक्रार मांडावी.” – ॲड. मनिषा भोरे, प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर, अकोला.