अकोला : पशुधनाला ‘लाळ खुरकत’ विषाणूजन्य रोगाचा धोका निर्माण झाला. यामुळे दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. पशुधनाच्या संरक्षणासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाला दोन लाख ४० हजार ६०० लसींच्या मात्रा प्राप्त झाल्या आहे. अकोला जिल्ह्यात दोन लाख ८३ हजार ६८ गाय व म्हैसवर्गीय जनावरे, तसेच एक लाख ६० हजार ६९७ शेळ्या, मेंढ्या आहेत. रोगांचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात लाळ खुरकत प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणापासून एकही पशुधन वंचित राहणार नाही याची सर्व संस्थाप्रमुखांना दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आजारात पशुधनास १०५ ते १०६ डिग्री ताप येतो. या आजाराने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. जनावरांच्या खुरामध्ये तसेच तोंडामध्ये जखमा होतात व त्यांचे खाणे पिणे बंद होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शेळ्या, मेंढ्यांमधील ‘पीपीआर’ हा रोग देखील विषाणूजन्य असून या आजारात १०५ ते १०६ डिग्री ताप येतो. नाकातून व डोळ्यांतून सारखे पाणी वाहते. तोंडामध्ये जखमा होतात, श्वास घेण्यास त्रास होतो. जनावरांना अतिसाराची बाधा होऊन मृत्यू होऊ शकतो.

हेही वाचा : कुलगुरू निवड प्रक्रियेवर सरकारी उधळपट्टी का? माजी व्यवस्थापन परिषद सदस्याचे राज्यपालांना पत्र

या रोगाची लागण सुद्धा एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पशुधनास या रोगाची लागण होऊ नये यासाठी लसीकरण करू घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेंद्र अरबट आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.

हेही वाचा : राम मंदिर सोहळा देशात पुरोहितशाही वाढवणार; मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांचा इशारा

गाभण जनावरांच्या गर्भपाताची भीती

गाभण गाय व म्हैस यांचा गर्भपात होऊ शकतो. या रोगाची लागण एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. “‘लाळ खुरकत’ विषाणूजन्य रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पशुधनांचे लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील ७५ पशुवैद्यकीय संस्थांना लसीच्या मात्रा वितरित करण्यात आल्या आहेत. सर्व पशुपालकांनी पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे.” – डॉ. जगदीश बुकतारे, पशुसंवर्धन उपायुक्त, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola saliva scraping disease to livestock milk production may be affected ppd 88 css