अकोला: आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरीही राज्य सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासने देतात. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येतो. भाजपाला याची कल्पना असूनही या प्रश्नाचा जाणीवपूर्वक खेळखंडोबा केला जात आहे. मूळात मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाच नाही. त्यामुळे त्यांनी आरक्षण देताना त्रुटी ठेवल्या होत्या, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केली.
अकोला दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा, ओबीसींसह अन्य समाजांचीही भाजपा दिशाभूल करीत आहे. कुणालाही आरक्षण द्यायचे असल्यास संविधानातील मर्यादेची अट शिथिल करावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारला हे आरक्षण देता येते का? हा विचार आधी केला पाहिजे. केंद्रात भाजपाचे पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. तरीही भाजपा ठोस पाऊले उचलत नाही. सरकारचे वेळकाढू धोरण असून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावनांसोबत भाजपा खेळत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक राज्यातील सत्तेत सहभागी आहेत. काही जण मराठा आरक्षणाला समर्थन असल्याचा देखावा करीत असले तरी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
हेही वाचा… “कापसाले चांगला भाव मिळालाच पायजे,” चिमुकल्या शिवानीची मागणी; एल्गार मोर्चात ठरली लक्षवेधी
अकोला शहरात अल्पवयीन मुलीवर अमानवीय पद्धतीने झालेल्या अत्याचार प्रकरणात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले. राज्यात सातत्याने दंगली होत असून महिलांवरील अत्याचार वाढले आहे. अंमली पदार्थांचा सर्रास व्यवसाय होत आहे, असा आरोप अंधारे यांनी केला. अकोल्यातील बलात्कार पीडित बालिकेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आर्थिक मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्यावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी मुलींना टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यावर शालेय विद्यार्थिनींजवळ फोन असतात का? असा सवाल अंधारे यांनी करून त्यांच्यावर निशाणा साधला. शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नैतिकता गमावली असून, त्यांनी राजकारण आणि समाजकारणाबद्दल बोलू नये, अशा शब्दात अंधारे यांनी सुनावले. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आम्ही जात-धर्म शोधत नसल्याचे सांगत त्यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनाही टोला लगावला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, अतुल पवनीकर आदी उपस्थित होते.