अकोला : ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, कोणी मधात आले तर खबरदार मी सर्वांना पाहून घेईल’, अशी धमकी देत तरुणाने मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांनी आरोपी शुभम विनायक नागलकर (२१) याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
२० नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्री आरोपी शुभम नागलकर व त्याचा भाऊ सोनू नागलकर हे मुलीच्या घरासमोर आले. घरासमोरील लाइट फोडून घराचा दरवाजा ठोठावला. आई-वडील व मुलगी बाहेर आले असता, आरोपी शुभम नागलकर याने मुलीचा हात पकडून ‘मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, कोणी मधात आले तर विचार करा,’ अशी धमकी दिली. यावेळी त्यांनी शिवीगाळदेखील केली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शुभम विनायक नागलकर याला भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड) (१) व पोक्सो कायदा कलम ११, १२ अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, तीन हजार रुपये दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सरकारी वकील शीतल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.