अकोला : पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले असताना पारंपरिक वाहनांकडेच नागरिकांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात सणासुदीच्या काळात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक पेट्रोल वाहनांची विक्री झाली. इलेक्ट्रिक वाहनधारकांची संख्यादेखील वाढली. दसऱ्याला दुचाकी व चारचाकीची हजारो नवीन वाहने रस्त्यावर आली आहे.
सणासुदीचा काळ म्हटला की खरेदीची चंगळ असते. विजयादशमीच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन वाहने घेतात. यंदा दसऱ्याला मोठ्या प्रमाणावर वाहनांची विक्री झाली. त्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात झाली आहे. १४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पेट्रोलवरील १०३७ वाहनांची विक्री झाली. डिझेलवरील ११६, तर ८२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. दसऱ्याच्या दिवशी ८८५ दुचाकींची विक्री झाली. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेक जण ई-वाहनाकडे वळले आहेत. शहरात आतापर्यंत अनेकांनी ई-वाहन खरेदी केली. वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळे फिचर्स असलेले ई-वाहन सध्या उपलब्ध आहेत.
अनेकांनी ई-वाहनांच्या खरेदीवर भर दिला. ऑक्टोबर महिन्यात ई-वाहनदेखील मोठ्या संख्येने विकले गेले. ई-वाहनांमध्ये नागरिक आता दुचाकीपुरतेच मर्यादित राहिले नसून चारचाकी, प्रवासी वाहने घेण्यामध्येदेखील रस दाखवित आहेत.
वाहनांची वाढती संख्या अन् वाहतूक कोंडी
खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र निर्माण झाले. अनेकांचे स्वत:च्या दुचाकी, चारचाकीचे स्वप्न असते. मात्र, शहराच्या दृष्टीने बघायला गेले तर याच खासगी वाहनांमुळे अकोल्यात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. घरात चार लोक असतात, मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळी वाहने खरेदी केली जातात. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. वाहतूक नियंत्रण करताना परिवहन विभागासह शहर वाहतूक शाखेची प्रचंड तारांबळ उडते.
हेही वाचा – मराठ्यांचे आंदोलन शांत होताच आता वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ‘या’ आहेत मागण्या..
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक वाहन खरेदी करतात. त्याच्या तत्काळ नोंदणीची व्यवस्था परिवहन विभागाने केली आहे. सर्वाधिक पेट्रोल वाहनांची विक्री झाल्याचे नोंदणीवरून दिसून येते. ई-वाहनांची संख्यादेखील गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. – जयश्री दुतोंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.
नागरिकांची पहिली पसंती पारंपरिक वाहनांनाच आहे. त्यामुळे पेट्रोल वाहनांची सर्वाधिक विक्री होते. प्रामुख्याने दसरा-दिवाळीच्या काळात दुचाकी, चारचाकी घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. – कमल आलिमचंदानी, वाहन विक्रेते, अकोला.