अकोला : शेतात पडलेल्या जिवंत वीज तारेने मोठा घात केला. डवरणीसाठी शेतात गेलेल्या चुलत भावांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलांच्या शोधात आलेले वडील देखील विजेच्या प्रवाहात आल्याने त्यांचा देखील दुर्दैवी अंत झाला. वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. वडील अशोक माणिक पवार, मुलगा मारोती अशोक पवार (२०) आणि पुतण्या दत्ता राजू पवार (१८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्याच्या टोकावर पांगरी महादेव हे गाव आहे. पेरणी आटोपल्याने आता शेतात डवरणी, फवारणी आदी कामे सुरू आहेत. गावातील मारोती अशोक पवार आणि दत्ता राजू पवार हे दोघे चुलतभाऊ दुसऱ्याच्या शेतात मजुरीने डवरणीच्या कामाला गेले होते. या शेत शिवारात जमिनीवर जिवंत वीज तार पडून होती. या वीज तारेकडे त्या दोघांचेही लक्ष गेले नाही. शेतात काम करीत असतांना विजेचा प्रवाह सुरू असलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात दोन्ही भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची कुणालाही माहिती नव्हती. मुले घरी उशिरापर्यंत परतली नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. मारोतीचे वडील अशोक पवार हे मुलांना शोधण्यासाठी त्याच शेतात गेले. काही कळायच्या आतच त्यांचा देखील जिवंत वीज तारेला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का असल्याने त्यांचा देखील मृत्यू ओढवला. ही घटना कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत महावितरणला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेत एकाच परिवारातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : विरोधी पक्षनेत्यावर सरकारचे विशेष प्रेम! घरकुल मंजुरीत इतर आमदारांना…

विजेच्या धक्क्याने मृत्यूचे प्रमाण वाढले

गेल्या काही महिन्यांमध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुलरचा वापर वाढतो. त्यातच कुलरमधून विजेचा प्रवाह होत धक्का बसल्याने अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागल्याचे प्रकार घडले. आता वाशिम जिल्ह्यात शेतातील जिवंत वीज तारेमुळे एकाच परिवारातील तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र रोष व संताप व्यक्त केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola three electrocuted after touching electric wires ppd 88 css