अकोला : अकोला भाजपकडून बेरजेचे राजकारण केले जात आहे. अकोट तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उबाठा शिवसेनेसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारला भाजपने मोठा धक्का दिला आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष जोमाने कामाला लागलेत. सोबतच संघटनात्मक वाढीवर देखील भर दिला जात आहे. विविध पक्षांमधून सत्ताधारी भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओढा चांगला वाढला. विविध पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश घेतला. यामध्ये प्रामुख्याने ठाकरे गटाचे शिवसेना व बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
हेही वाचा…बुलढाणा : ७७ गावांत पाणी पेटले! राजकीय नेते कार्यक्रमात व्यस्त
अकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. भाजपच्या जिल्हा कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे, विजय अग्रवाल आदींसह भाजप पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अकोट तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. रणधीर सावरकर यांनी भाजपमध्ये कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा…बुलढाणा : गुंतवणूक परिषदेत तब्बल ११५० कोटींचे सामंजस्य करार
पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांचा सन्मान करून नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या बळावर भारत निर्माणासाठी आगामी लोकसभेत ‘चारसो पारचे’ लक्ष्य गाठले जाईल. आगामी निवडणुकांमध्ये भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या कार्याची दखल पक्ष पातळीवर निश्चितपणे घेतली जाईल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.