अकोला : खासगीकरणाच्या विरोधात सम्यक आणि वंचित युवा आघाडीच्यावतीने शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. नोकर भरतीचे खासगीकरण, पेपरफुटी विरुद्ध कायदा, भरमसाठ परीक्षा शुल्क, कंत्राटी शिक्षक भरती, शाळांचे खाजगीकरण व दत्तक देण्याचा घाट, समूह शाळा आदींच्या विरोधात तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली.
सम्यक आणि वंचित युवा आघाडीच्यावतीने वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या नेतृत्वात शास्त्री क्रीडांगणावरून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व सरकारी क्षेत्रातील खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे. वाढीव शुल्क रद्द करण्यात यावे.
हेही वाचा : युनिसेक्स सलुनच्या नावावर १६ वर्षीय मुलीकडून देहव्यापार
स्पर्धा परीक्षेसाठी राजस्थानच्या धर्तीवर एकच परीक्षा शुल्क आकारण्यात यावे. परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात. जि.प.शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा. सर्व शासकीय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने करण्यात यावी. राज्यसेवा व सरळसेवा पदभरती एमपीएससीच्या मार्फत करण्यासाठी आयोगाला अध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांची नियुक्त करावी. सर्वांना मोफत शिक्षण मिळावे.
हेही वाचा : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वेत होणाऱ्या गर्दीवर याचिका, काय म्हणाले भदंत सुरई ससाई…
शिक्षणाचे खासगीकरण तातडीने थांबवावे. केंद्र राज्य सरकारच्या विविध परीक्षांसाठी तालुका स्तरावर परीक्षा केंद्र सुरु करावे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते दहावीपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण द्यावे आदी मागणी करण्यात आल्या. मोर्चामध्ये प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.