अकोला : महाराष्ट्रात पक्षांतराच्या राजकारणाने जोर पकडला असतांना ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने लाल रंगात केलेल्या फलकबाजीने लक्ष वेधून घेतले आहे. या फलकांवर ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे छायाचित्र टाकण्यात आले असून ‘ये दिल मांगे…’ असा मजकूर नमूद केला आहे. या फलकबाजीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. परंपरागत अकोला मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करून गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली. ॲड. आंबेडकर १९८४ पासून सातत्याने अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आले आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते येथून आपले नशीब आजमावतील. वंचितचा ‘मविआ’मध्ये समावेशाची चर्चा झाली. आघाडीमध्ये वंचितचा सर्वप्रथम अकोला लोकसभेवर दावा राहील. त्यामुळे काँग्रेसला ही जागा सोडावी लागणार आहे. तसेही काँग्रेसला सातत्याने मोठ्या फरकाने येथे पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेससाठी अकोल्याची जागा अवघड जागेचे दुखणेच ठरते. ॲड. प्रकाश आंबेडकरांसाठी अकोल्याची जागा सोडण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी सुद्धा वारंवार बोलून दाखवली. त्यामुळे अकोल्याची जागा आघाडीसाठी अडचणीची ठरणार नाही. आघाडी झाल्यास अडीच दशकानंतर पुन्हा अकोला लोकसभेच्या रिंगणात भाजप व वंचितमध्ये काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्याची ‘आर्थिक वाहिनी’ बंद होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या कारण…
दरम्यान, वंचितने गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीवर भर दिला. विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस वंचित आघाडीने फलकबाजीवर अधिक लक्ष दिले. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘नया साल, नया खासदार’ अशा आशयाचे फलक झळकले होते. आता पुन्हा अशाच प्रकारचे फलक शहरातील विविध भागात लागले आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त लाल रंगाचे फलक चौकाचौकात लावले आहेत. ‘ये दिल मांगे…’ असा मजकूर लिहून प्रकाश आंबेडकर यांचे छायाचित्र फलकावर आहे. याशिवाय इतर ही फलक शहरात वंचितने लावले आहेत. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या छायाचित्रासह ‘हिम्मतवाला’, ‘यही है राईट चॉईस’, ‘जिंदा बंदा’ असे मजकूर नमूद आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त लाल रंगातून प्रचार मोहीम तर आहेच, मात्र यातून काही राजकीय संदेश दिला जात आहे का? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही फलकावरून भाष्य केल्याचे दिसून येते.