अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात वंचितने काँग्रेसचे युवा नेते तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन यांना ऐनवेळी उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात अकोला पश्चिम मतदारसंघातून महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. २०१९ मध्ये त्यांनी भाजपला कडवी झुंज दिली होती. त्यानंतर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून आता १८ जण इच्छुक होते. गंभीर गुन्ह्यांमध्ये पठाण यांचे नाव असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

हेही वाचा…रामटेकमध्ये मुळक रिंगणातच, उमरेडमध्ये राजू पारवेंची माघार

u

अखेर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांनाच अकोला पश्चिममधून निवडणूक रिंगणात उतरवले. पक्षाच्या या निर्णयामुळे इतर इच्छुकांमध्ये नाराजी होती. काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून निवडणूक लढण्यासाठी ‘वंचित’ची वाट निवडली. वंचित आघाडीने डॉ. हुसेन यांना अकोला पश्चिममधून उमेदवारी देखील जाहीर केली होती. त्यांना वंचित आघाडीचा एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. मतविभाजन होऊन त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता होती.

हेही वाचा…सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी वंचितचे उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार असतांनाही डॉ. हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला असून आता अकोला पश्चिम मतदारसंघात वंचितचा उमेदवार नाही. नागपूरमध्ये अनिस अहमद यांनी वंचितमध्ये प्रवेश करीत एबी फॉर्म घेतला, वेळेअभावी उमेदवारी दाखल केली नसल्याचे चित्र निर्माण केले. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. आता अकोल्यात सुद्धा काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन यांनी वंचितकडून उमेदवारी दाखल करीत अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचा हा राजकीय डाव असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, भाजपचे माजी नगरसेवक संजय बडोणे आदींनी देखील अपक्ष अर्ज मागे घेतला. ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची माफी मागून वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. – डॉ. झिशान हुसेन, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola vanchit bahujan aghadi zeeshan hussain application withdrawn from election ppd 88 sud 02