अकोला : शेतामध्ये रोडगे पार्टी करण्याचे नियोजन करताय तर सावध होण्याची गरज आहे. शेतात किंवा एखाद्या निर्जनस्थळी धुरामुळे परिसरातील मधमाश्यांचे पोळे बाधित होऊन मधमाश्या आक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे एका शेतात आयोजित केलेल्या रोडगे पार्टीवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रोडगे पार्टी जीवावर बेतल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात काजळेश्वर नावाचे गाव आहे. या गावातील प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतामध्ये आज रोडगे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या रोडगे पार्टीला अनेकांना निमंत्रित करण्यात आले. या पार्टीची सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू होती. रोडगे पार्टीतील अन्न शिजवण्यासाठी परिसरात गौऱ्या जाळण्यात आल्या. त्याच्या निखाऱ्यावर रोडगे भाजण्याचे काम सुरू असताना त्यातून निघालेल्या धुरामुळे शेतातील झाडावरील मधमाश्यांच्या पोळ्याला झळ पोहोचली. त्यामुळे मधमाश्यांनी आक्रमक होऊन परिसरातील नागरिकांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच गोंधळ उडून परिसरात धावपळ सुरू झाली. मधमाश्यांपासून वाचण्यासाठी आसरा घ्यायला कुठेही जागा नव्हती. मधमाश्यांनी आक्रमक होत हल्ला केला. मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तत्काळ सर्व जखमींना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात आणले. या मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये रेश्मा आतिश पवार यांचा मृत्यू झाला, तर मीरा प्रकाश राठोड, दोन लहान मुले यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात जखमींवर उपचार केले जात आहेत. रोडगे पार्टीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे देखील वातावरण आहे.

मधमाश्यांच्या हल्ल्यापासून सावध राहण्याची गरज

मधमाश्यांच्या हल्ल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला येत असतात. मधमाश्यांचा हल्ला हा भयंकर व गंभीर स्वरूपाचा असतो. त्यांचा हल्ला मानवी जीवावर देखील बेतू शकतो. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील काजळेश्वर येथे घडलेल्या घटनेवरून आलाच आहे. त्यामुळे शेतात किंवा जंगलात जाताना मधांच्या पोळ्यापासून सावधान रहायला हवे. मधमाश्यांचा डंख जीवघेणा ठरू शकतो. ग्रामीण असो वा शहरी भाग मधमाश्यांच्या हल्ल्याचे प्रकार सर्वत्र घडत असतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन प्रत्येकाने सावधता बाळगणे गरजेचे आहे.

Story img Loader