अकोला : गरजू व बेघर लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी महाआवास अभियान राबवले जात आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनेत १०० दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण करून अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. उद्दिष्टापेक्षा ८३ टक्के अधिक घरकुलांची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली. आतापर्यंत साडेचार हजारावर घरकुल पूर्ण झाले आहेत.
शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमात महाआवास अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना ग्रामीण भागात जिल्ह्याचे दोन हजार ५१६ उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थींना घरकुल मंजुरीपत्र व २१ हजार ६२७ लाभार्थींना पहिला हप्त्याचे वितरण झाले.
महाआवास योजनेत घरे पूर्ण करून गरजूंना लाभ मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिले होते. त्यानुसार प्रक्रिया गतीने राबविण्यात आली. या प्रक्रियेत घरकुलांना मंजुरी देणे, प्रथम हप्ता वितरित करणे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणे, घरकुल बांधकाम पूर्ण करणे असे उद्दिष्ट निश्चित केले.
प्रशासनाकडून कामाला गती देत उद्दिष्टापलीकडे जाऊन एकूण चार हजार ६०० घरकुलांचे काम पूर्ण झाले. या उल्लेखनीय कामगिरीसाठी ग्रामीण गृहनिर्माण संचालक कार्यालयाकडून जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनाचे कौतुक केले.
राज्यातील जिल्ह्यांच्या कामगिरीवर आधारीत क्रमवारी निश्चित केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम व अकोला जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार असल्याने त्यांचे जीवनमान सुरक्षित आणि स्थिर होण्यासाठी मदत होईल.
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना हक्काचा निवारा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी सांगितले.