अकोला : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला आहे. विविध पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या सभांनी मैदान गाजत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा प्रखर हिंदुत्ववादी भाजप नेते अशी ओळख असलेले योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा मूर्तिजापूर येथे ६ नोव्हेंबरला झाली. या प्रचारसभेमध्ये योगी आदित्यनाथ यांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे मूर्तिजापूर गाठून सभेमध्ये २० मिनिटांचे भाषण केले. त्यानंतर ते आपल्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. योगी आदित्यनाथ हेलिकॉप्टरमधून रवाना होत असतांनाच खाली मैदानावर जेसीबीवर योगी आदित्यनाथ यांचा पेहराव केलेल्या भाजप कार्यकर्त्यासह उमेदवार हरीश पिंपळे यांनी मिरवणूक काढली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगींच्या पेहरावातील भाजप कार्यकर्ते अगदी त्यांच्या सारखे वाटत होते. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी जेसीबीतून मिरवणूक काढत प्रचार केल्याची देखील चर्चा रंगली होती. नंतर ते योगी आदित्यनाथ नव्हे तर त्यांच्यासारखा पेहराव करणारे भाजप कार्यकर्ते असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे पेहराव करणारे भाजपचे कार्यकर्ते संतोष धुळे हे होते. मूर्तिजापूरमधील तेलीपूरा येथे ते राहतात. भाजपचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथांसारखा पोषाख परिधान करून ते सभेत आले होते. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. हरीश पिंपळे यांनी प्रचारासाठी त्यांचा वापर करून घेतला. जेसीबीमधून त्यांच्यासोबत हरीश पिंपळे यांनी मिरवणूक काढली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा : “राज्‍यात तीन भाऊ, मिळून महाराष्‍ट्र खाऊ…”, उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका

विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा ज्वर चढला. मोठ्या नेत्यांच्या सभांमधून प्रचाराचा धुरळा उडत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जेसीबीतून मिरवणूक काढत भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याची एक चित्रफित सध्या समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे. मात्र, या मिरवणुकीतील योगी आदित्यनाथ हे खरे नसून त्यांचा हुबेहुब पेहराव साकारलेले भाजप कार्यकर्ते आहेत. भाजप उमेदवाराच्या या कल्पनेची चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा : “हफ्ते घेणारे नव्हे; हफ्ते देणारे आमचे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

“दहशतवादाचे मूळ कलम ३७० मोदींनी उखडून फेकले”

कलम ३७० दहशतवादाचे मूळ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते उखडून फेकले, असे योगी आदित्यनाथ जाहीर सभेत म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधानंतरही कलम ३७० काँग्रेसने संविधानात टाकले. दहशतवादाला खतपाणी घालणारे हे कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपवून टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या भारताचा सर्वांगीण विकास झाल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola yogi adityanath look alike on jcb at yogi adityanath public rally ppd 88 css