अमरावती : एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. दरम्यान, शवविच्छेदन अहवालावरून ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यावरून अत्याचाराचा प्रकारही उघडकीस आला. अत्याचारातून गर्भधारणा झाल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शहाणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एका १५ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नांदगाव पेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार कर्तव्य अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शहाणे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्यांना पीडित मुलगी ही राहत्या घरी बेडरुममध्ये पंख्याला स्टोलच्या मदतीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत मुलीच्या मामाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास आरंभला.
दरम्यान, रविवार, १६ फेब्रुवारी रोजी तिचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर ती गर्भवती असल्याचा लेखी अभिप्राय संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिला. त्यानुसार अज्ञात आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यातून गर्भधारणा झाल्याने तिने गळफास लावून आत्महत्या केली, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शहाणे यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलीच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ती मामाकडे राहून शिक्षण घेत होती.
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १३२ बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील ९८ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या ७४ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी निगडीत आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची दोन प्रकरणे, चांदूर रेल्वे आणि लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक प्रकरण उघडकीस आले. वासनांध नराधमांनी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात सुमारे ९८ अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले असून, त्यापैकी २३ मुलींवर मातृत्वाचा भार लादल्याची माहिती पुढे आली आहे.