अमरावती : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिला आज पात्र ठरल्या असून, योजनेचा लाभ त्यांच्या खात्यात जमा होत आहे. पात्र ठरलेल्‍या बहिणींच्‍या खात्‍यात ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्‍यांचे तीन हजार रुपये जमा होण्‍याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, जिल्‍ह्यातील तब्‍बल २५ हजार १८७ लाडक्‍या बहिणींची रक्‍कम त्‍यांचे ‘आधार सिडिंग’ नसल्‍याने अद्यापही खात्‍यातच अडकून पडली आहे. गेल्‍या महिनाभरापासून बँकांमध्‍ये महिलांनी केवायसी, आधार सिडिंगसाठी अर्ज केले आहेत. मात्र अनेकवेळा ‘सर्व्‍हर डाऊन’ असल्‍याने बँकांमध्‍ये गोंधळ निर्माण होत आहे.

लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र महिलांचे बँक खाते सिडिंग नसल्‍यामुळे अडचणी येत आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या खात्‍यावर जमा झालेले पैसे काढता येत नाहीत. आधीचे ४ हजार ५०० आणि आता जमा झालेले ३ हजार रुपये असे ७ हजार ५०० रुपये बँक खात्‍यात जमा झाल्‍याचे संदेशही महिलांना आले आहेत. मात्र, ते काढता येत नसल्‍याने महिला बँकांमध्‍ये गर्दी करीत असून अनेक ठिकाणी वाद होऊ लागले आहेत.

हेही वाचा : बाप नव्हे राक्षसच… पत्नी बाहेर जाताच करायचा मुलीवर बलात्कार

महिला व बालविकास विभागाकडे ७ लाख ३ हजार ३ महिलांचे अर्ज प्राप्त झाले. यापैकी अर्जाची पडताळणी करत ६ लाख ९२ हजार १७५ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले. यात ३ हजार २३६ महिलांचे अर्ज कागदपत्रांअभावी फेटाळले, तर ३४० अर्जांची पडताळणी सुरू आहे. १ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे दोन टप्यात ७५०० रुपयांचे अनुदान महिलांना प्राप्त झाले आहे. परंतु ३५ हजार ३७ हजार ४११ लाडक्या बहिणींचे अनुदान बँकेला ‘आधार सिडिंग’ नसल्याने थांबवण्यात आल्याचा अहवाल शासनाकडून जिल्हास्तरावर प्राप्त झाला होता. यातून आतापर्यंत १२ हजार २२४ महिलांचे ‘आधार सिडिंग’ ची प्रक्रिया बँकांनी पूर्ण केल्याने आता त्यांच्याही खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु अद्यापही २५ हजार १८७ महिलांची ‘आधार सिडिंग’ नसल्याने त्यांचे अनुदान मात्र थांबले आहे. या महिला बँकांमध्ये पायपीट करत आहेत. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. सध्या ‘आधार सिडिंग’ व केवायसीची गर्दी बँकांमध्ये झाल्याने त्यांच्याकडून या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.