अमरावती : स्पर्धा परीक्षेत सतत अपयश येत असल्याने नैराश्यातून ३० वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली आहे. श्रद्धा निखिल मोडक (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रद्धा ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. अनेकदा परीक्षेत यशाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिल्याने ती नैराश्यात होती.
श्रद्धा ही पती निखिल मोडक (३४) याच्यासमवेत अंजनगाव सुर्जी येथील शिक्षक कॉलनीत अरुण दाभाडे यांच्या घरात भाड्याने राहत होती. मूळचे वणी येथील हे दाम्पत्य आहे. निखिल हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. मंगळवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर श्रद्धाने गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. तिला तातडीने खाली काढले. पण, तिचा मृत्यू झाला. निखिलने घटनाक्रम पोलीस ठाण्याला कळविला. घटनास्थळी दाखल होत पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
आत्महत्येपुर्वी श्रद्धा हिले पत्र लिहून ठेवले. त्यात पती, सासू, सासरे यांना दोष देत नाही. बँकिंग परीक्षेत वेळोवेळी अगदी थोडक्या गुणांनी क्रमांक हुकल्याचे नमूद केले आहे. तिने नैराश्येच्या गर्तेत जाऊन आत्महत्या केल्याचे यातून समोर आले. ठाणेदार अहिरे यांच्या मार्गदर्शनात संजय इंगळे व नितीन इंगळे तपास करीत आहेत.