अमरावती : खराब रस्ते, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यांसह अनेक कारणांमुळे २०२३ मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या ३२६ प्राणांतिक अपघातात ३५९ बळी पडले, तर ५११ जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण ६२२ अपघातांपैकी सर्वाधिक २९८ अपघात हे राज्य महामार्गांवर, १८६ अपघात अन्य रस्त्यांवर तर १३८ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या संख्येत घट आल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात २०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर दरम्यान एकूण ५८९ अपघातांमध्ये ३५८ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर ४०३ जण जखमी झाले होते.
अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, चुकीच्या आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा ही अपघातामांगची प्रमुख कारणे आहेत. तर दृतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाडांचे टायर फुटणे ही अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत.
रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची असमान पातळी, भरधाव वाहन चालविणे, शिरस्त्राण परिधान करण्यास टाळणे ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. अपघात होऊ नयेत, यासाठी वाहतूक शाखेकडून नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असली, तरी त्यांना न जुमानता बेदरकारपणे वाहने चालवली जात असल्याचे या अपघातांच्या संख्येवरून दिसून येत आहे. बहुतांश अपघातांत डोक्याला मार लागल्याने बळी पडले असून दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास बळींची संख्या कमी होऊ शकते असे पोलीस अधिकाऱ्यांचे मत आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे आणि त्यामध्ये होणारे मृत्यूही जास्त आहेत. रस्ता सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही अपघात व त्यामध्ये होणारे मृत्यू कमी होताना दिसत नाहीत.
हेही वाचा : नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्यावर गोळी सुटली नव्हे, झाडली !
जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ६२२ अपघात घडलेत. त्यात ३२६ प्राणांतिक अपघात, १४० गंभीर अपघात तर १४१ किरकोळ अपघात होते. १५ अपघातांत कुणीही जखमी झाले नाही. ६२२ अपघातांपैकी ३२६ अपघात प्राणांतिक ठरले. त्यात एकूण ३५९ जणांचा मृत्यू झाला. मे महिन्यात सर्वाधिक ४१ अपघातांत ४६ जणांचा बळी गेला. तर एकूण ५११ जण जखमी झाले. या काळात १४० अपघात गंभीर होते. त्यात सुमारे २५९ जण कायमचे जायबंदी झाले. त्यात २०९ पुरुष व ५० महिलांचा समावेश आहे. १४१ किरकोळ अपघातांत १९९ पुरुष व ५३ महिला असे एकूण २५२ जण जखमी झाले.