अमरावती: पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
या हंगामात स्पर्धेच्या निकषात शिथिलता व आवश्यक बदल करण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग लाभणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय ४० हजार रुपये तर तृतीय पारितोषिक ३० हजार रुपये आहे.
हेही वाचा… ७९५ रुपयांमध्ये २० लाखांचा अपघात विमा; टपाल खात्याची योजना, जाणून घ्या सविस्तर…
प्रयोगशील शेतकऱ्यांचा शासनाच्या वतीने सन्मान केल्याने उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन अन्य शेतकऱ्यांना मिळून जिल्ह्याच्या एकूण उत्पादनात भर पडणार आहे. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या नावे जमीन असली पाहिजे व तो स्वत: शेती कसत असला पाहिजे, ही स्पर्धेची प्रमुख अट आहे.
हेही वाचा… बुलढाण्यात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदासाठी चौघांत चुरस; पक्ष निरीक्षकांनी घेतला संघटनात्मक आढावा
शेतकऱ्यांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येणार आहे. मूग व उडदासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतील, तर धान, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल व करडई पिकांसाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.