अमरावती : एका डॉक्टरने परिचयातील तरुणीच्या नियोजित वराकडील मंडळींना खोटी माहिती दिली. त्यांच्याकडे तरुणीची बदनामी करीत तिचे लग्न मोडल्याची धक्कादायक घटना दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. जयदीप पावडे (३०) रा. दर्यापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डॉ. जयदीप पावडे याचे दर्यापुरात हॉस्पिटल आहे. पीडित २७ वर्षीय तरुणीच्या आजीचा त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. ती आजीला घेऊन नेहमीच डॉ. जयदीप पावडे याच्या हॉस्पिटलमध्ये जायची. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली. डॉ. जयदीप पावडे हा पीडित तरुणीला अधूनमधून मोबाइलवर संपर्क देखील साधत होता. तेव्हा मला फोन करत जाऊ नका, असे तिने त्याला बजावले होते.
दरम्यान, तरूणीच्या विवाहासाठी वर शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. २४ मार्च रोजी तरुणीचा एका तरुणाशी साखरपुडा झाला. मे महिन्यात लग्नाची तारीख ठरली. त्यानंतरही डॉ. जयदीप पावडे याने तरुणीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू थांबली नाहीस, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझ्याबद्दल खोटी माहिती सांगून तुझी बदनामी करेन, अशी धमकी डॉ. जयदीप पावडे याने तरुणीला दिली. तरूणीने त्याकडे दुर्लक्ष केले, पण समोर काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज तिला आला नव्हता.
दरम्यान, ३० मार्च रोजी तरुणीच्या नियोजित वराकडील मंडळी तिच्या घरी आली. डॉ. जयदीप पावडे हा आपल्या घरी भेटण्यासाठी आला होता, असे त्यांनी सागितले. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्नसंबंध जोडले आहे, तिचे लग्न झाले आहे, असे सांगून त्याने विवाहाचे प्रमाणपत्र देखील दाखविले. त्यामुळे आम्ही हे संबंध तोडत आहात, असे सांगून ते निघून गेले. हा धक्कादायक प्रकार कळताच पीडित तरूणीचे कुटूंब हादरून गेले. डॉक्टरला तरूणीने आपल्यासोबत संपर्क साधू नको, असे बजावून देखील तो तरूणीचा पाठलाग करीत होता. त्याने विवाहाचे प्रमाणपत्र कसे तयार केले, हे पीडित तरूणीचया कुटुंबीयांसाठी एक कोडेच ठरले. अखेर तरुणीने दर्यापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. पण, या प्रकारामुळे पीडित तरूणी चांगलीच भयभीत झाली आहे.