अमरावती : “लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, त्याबद्दल कुणी शंका बाळगण्याचे कारण नाही”, असे सांगून भाजप प्रवेशाचे संकेत खासदार नवनीत राणा यांनी दिले असले, तरी त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. नवनीत राणा यांना प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत का, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारल्यावर “अजून नवनीत राणा भाजपमध्ये आलेल्या नाहीत”, असे स्पष्ट करीत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केला नाही. दरम्यान विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करताना सांगितले की, मी युवा स्वाभिमान पक्षाची कार्यकर्ती आहे, त्यामुळे आमचा पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य आहे. आम्ही (युवा स्वाभिमान पक्ष) एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्यामुळे आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील, त्या आदेशाचे आम्ही पालन करू. तर आमदार रवी राणा यांनी आम्हाला काही महत्वाचे संकेत मिळाले आहेत, ते लवकरच सर्वांना माहीत होईल, असे सांगितले होते. पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा यांनी लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, त्याबद्दल कुणी शंका बाळगण्याचे कारण नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या सूचक वक्तव्याची चर्चा एकीकडे रंगली. दरम्यान, सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नवनीत राणा अजून भाजपमध्ये आलेल्या नाहीत, असे सांगून ‘सस्पेन्स’ वाढवला आहे.
हेही वाचा : विदर्भातील राजकीय रणांगण बिनचेह-यांचे !
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणांनी लगेच केंद्रातील भाजप सरकारला समर्थन देऊन आपली दिशा स्पष्ट केली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या समोर हनुमान चालिसा पठण प्रकरणानंतर त्यांची तुरूंगवारी घडली होती. नवनीत राणा यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेत भाजपशी जवळीक वाढवली, पण अद्याप त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळालेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी नागपूर येथे झालेल्या भाजयुमोच्या कार्यक्रमाच्या वेळी देखील नवनीत राणा यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार राहणार, की भाजप त्यांना पाठिंबा देणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.