अमरावती : रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या खूप जास्त असते. रेल्वे स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. रेल्वेने प्रवासादरम्यान काही वस्तू बाळगण्यास बंदी घातली आहे. या वस्तू प्रवाशांना सोबत नेता येत नाहीत. मध्य रेल्वेने फटाके वाहून नेल्याने जीविताला धोका असल्याचा इशारा दिला आहे. रेल्वेत ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू नेणे हा दंडनीय गुन्हा असून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, फटाके, गॅस सिलेंडर, बंदुकीची पावडर, असे कोणतेही ज्वलनशील पदार्थ घेऊन रेल्वेने प्रवास करू नका, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
हेही वाचा : अमरावती विभागात रब्बीची पेरणी संथ; पाच टक्केच क्षेत्रात पेरणी
रेल्वे डब्यात स्टोव्ह, गॅस किंवा ओव्हन वापरू नका. सिगारेट पेटवू नका, रेल्वेत ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू नेताना पकडले गेल्यास तो रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १६४ आणि १६५ अन्वये दंडनीय गुन्हा आहे. अशा परिस्थितीत एक हजार रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.