अमरावती : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट मिळवून देण्याच्या नावावर अनेक दलाल प्रवाशांची लूट करतात. असा काळाबाजार करणाऱ्या दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी ७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७७ जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : आमदार राजू पारवे यांची भराडी समाज बांधव आणि आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांसोबत दिवाळी
मध्य रेल्वेने आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध मोहीम तीव्र केली आहे. सायबर विभागाकडून मिळालेली माहिती आणि इतर पूरक माहितीच्या आधारे मध्य रेल्वेचे सुरक्षा पथक छापे टाकत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. अवैध ऑनलाईन तिकीट प्रकरणात गुंतलेल्या दलालांकडून तिकीट खरेदी करणे महागात पडू शकते. अशा तिकिटावर प्रवास केला जाऊ शकत नाही. कायदेशीर कारवाईमुळे तिकीट रद्द केल्यास आर्थिक नुकसानीचा फटका प्रवाशांना बसू शकतो.