अमरावती : श्री अंबादेवी मंदिरासमोरील होळीला सुमारे दोनशे वर्षांचा सांस्कृतिक वारसा आहे. ती नवसाची होळी म्हणून प्रसिद्ध आहे. अंबामातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक या होळीला मोठ्या भक्तिभावाने नारळाची ओटी बांधतात.

पूर्वी लहान स्वरूपात ही होळी साजरी व्हायची. दरवर्षी शहरातील भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनाला येतात. दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला मंदिरासमोर हेट्याचे (हादगा) झाड गाडले जाते. त्याची पूजा केली जाते. होळी पौणिर्मेपर्यंत भाविक या झाडाला ओट्या बांधतात. आपल्यावरील संकट दूर व्हावे, दुर्गुणांचा नाश व्हावा, अशा श्रद्धेने भाविक या झाडाला नारळाची ओटी बांधतात व श्री अंबामातेची पूजा करतात.

श्री अंबादेवी मंदिरासमोर महिनाभर आधीच माघ पौर्णिमेला होळी उभारली जाते. या होळीत महिनाभर नवसाचे नारळ रचले जातात आणि ओटी भरली जाते.

माघ पौर्णिमेपासून अंबादेवी मंदिरासमोर होळी रचण्यात आली आहे. या होळीला महिला ओटी आणि नारळ वाहण्यासाठी रोज येत आहेत. महिला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी होळीला ओटी भरून नवस करतात. यासह ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्या महिला देखील होळीची ओटी भरतात आणि नारळ अर्पण करतात. फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी विधीद्वारे होळी पेटवली जाते. होळीला देवी मानले जाते. मंदिर संस्थानाच्या वतीने खणा-नारळाची ओटी भरली जाते. यावेळी शेकडो भाविक होळीमध्ये नारळ अर्पण करतात.

दर्शनाला हजारो भाविक मंदिरात येत असतात. काही जळत्या होळीला नारळ अर्पण करतात. त्यामुळे ही नारळाची होळी शहरातील मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. हादग्याच्या झाडाला नारळ, खारीक, बदाम, तांदळाची ओटी बांधली जाते. या सर्वच पदार्थांचे दहन होत नसल्याने त्यातून जी राख उरते तीही गुणकारी असल्यामुळे होळीचे दहन झाल्यानंतर ज्यावेळी ती थंड होते. त्यावेळी ही राख विभूती म्हणून कपाळाला लावली जाते, अशी माहितीही संस्थानाच्‍या वतीने देण्यात आली.

माघ पौर्णिमेला हादग्याचे वाळलेले झाड दोन्ही मंदिरांपुढे खड्डा खोदून त्यात गाडले जाते. त्यानंतर मंदिराद्वारे प्रथम तेथे रंगीत कापडात नारळ बांधले जाते. त्यानंतर भाविक या झाडाच्या फांद्यांना रंगीत कापडात गुंडाळून नारळ बांधत असतात. ही प्रक्रिया फाल्गुन पौर्णिमेपर्यंत सुरू असते. या कालावधीत मोठ्या झाडाला हजारावर नारळ बांधले जातात. त्यानंतर या सर्व नारळांचे होळी पौर्णिमेला परंपरेनुसार दहन केले जाते.

Story img Loader