अमरावती : भाजपच्‍या अमरावती लोकसभा मतदार संघातील उमेदवार नवनीत राणा यांनी तेलंगणात केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचे पडसाद अमरावतीतही उमटले असून त्‍यांच्‍या विरोधात येथील राजापेठ पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. काँग्रेसला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे, असे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य नवनीत राणा यांनी तेलंगणातील जहिराबाद लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार बी.बी. पाटील यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर प्रसार माध्‍यमांशी बोलताना केले होते. तसेच काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबतही चुकीचे वक्‍तव्‍य त्‍यांनी केले. त्‍यामुळे नवनीत राणा यांच्‍यावर फौजदारी स्‍वरूपाचे गुन्‍हे दाखल करण्‍यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर आणि काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्‍तानचे नाव काँग्रेस पक्षासोबत जोडून काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्‍यात येत आहे. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत वादग्रस्त असून देशाच्या संविधानाने निवडणूक आयोगाच्‍या माध्‍यमातून निवडणूक प्रक्रियेमध्ये जातीय, धार्मिक व इतर देशांबाबत वक्‍तव्‍याविषयी मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी तसेच प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी नवनीत राणा यांनी देशाच्या मतदारांचा अपमान केला आहे.

हेही वाचा : नागपूर : शाळेतून मुलीला घरी सोडताना निर्जनस्थळी नेले; पण, ‘तो’ नराधम ऑटोचालक अखेर अडकलाच, पोलिसांनी….

२०१४ आणि २०१९ मध्ये खासदार नवनीत राणा यांनी अमरावती मतदार संघातून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या समर्थनावर निवडणूक लढविली होती व २०१९ ची निवडणूक जिंकलीही होती, तेव्हा काँग्रेस पक्षाचे का सहकार्य घेतले? नवतीत राणा या काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांच्या पाठिंब्‍यावरच खासदार झालेल्या आहेत, हे विसरता कामा नये. नवनीत राणा यांनी मतदारांचा विश्वासघात केलेला आहे, त्‍यांना अशा प्रकारचे विधान करण्याचा नैतिक अधिकार नाही. देशात, राज्यात तसेच अमरावती जिल्‍ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने खासदार नवनीत राणा यांनी केलेल्‍या गंभीर विधानाबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी केली आहे. वादग्रस्‍त वक्‍तव्‍याबद्दल नवनीत राणा यांच्‍या विरोधात याआधीच तेलंगणातील शादनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati congress demand police case against bjp leader navneet rana for controversial statement mma 73 css