अमरावती : आम्ही काँग्रेसजन राम मंदिराच्या विरोधात आहोत, असा दुष्प्रचार केला जात आहे. पण, आम्ही राम मंदिराच्या उभारणीच्या विरोधात नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय लाभासाठी निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा ‘इव्हेंट’ साजरा करीत आहेत, त्याला आमचा विरोध आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी येथील काँग्रेस भवनात अमरावती विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्निथला म्हणाले, राम मंदिराचे बांधकाम अर्धवट स्थितीत असताना श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. ही रामाची भक्ती असूच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखलेला डाव आहे. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. ज्या काँग्रेसजनांना अयोध्येला जायचे आहे, त्यांना आम्ही रोखलेले नाही. ते तेथे जाऊ शकतात. पण, ज्या पद्धतीने भाजप हा अयोध्येतील राम मंदिराचे राजकारण करीत आहे, ते लोकांनी ओळखले आहे. जनसमर्थन आमच्या बाजूने आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल, असा दावा रमेश चेन्निथला यांनी केला.
हेही वाचा : “ना शौक, ना मजबुरी , हेल्मेट है जरुरी” नागपूरात महिला आरटीओ अधिकाऱ्यांची हेल्मेट रॅली..
रमेश चेन्निथला यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राज्यातील सरकार हे जनविरोधी आहे. ईडी आणि सीबीआयची धमकी देऊन आमदारांना फोडून भाजपने सरकार स्थापन केले आहे. हा प्रकार लोकांना मुळीच आवडलेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील लोक हे जनविरोधी सरकार हद्दपार करेल आणि महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा दावा देखील चेन्निथला यांनी केला.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या शाळा उपक्रमाला शिक्षण संस्थांचा विरोध, कारण… परीक्षांवर बहिष्काराची हाक
महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा सुरू असून योग्य वेळी सर्व तपशील सांगितले जातील, असे चेन्निथला म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चर्चा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. चेन्निथला म्हणाले, की काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आहेत. कुणीही पक्ष सोडून जाण्याचा विचार केलेला नाही. भाजप मात्र लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहे. त्यांना अपयश समोर दिसत असल्याने हे प्रकार सुरू आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत देखील अशाच अफवा पसरविल्या जात आहेत, त्यात काहीही तथ्य नाही.
हेही वाचा : मृत कंत्राटी वीज कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आता चार लाख; ऊर्जामंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून तरतूद
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आधी भारत जोडो यात्रा काढली. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आता भारत जोडो न्याय यात्रेतून तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी चर्चा करीत आहेत. राहुल गांधी हे भारताला जोडण्यासाठी निघाले आहेत, असे चेन्निथला यांनी सांगितले.