अमरावती : नाशिकमधील अंमली पदार्थांचे लोण अमरावती सारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, महाविद्यालयांमधील मुलांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक मधील प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. सरकारने महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नये. राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय अंमली पदार्थांची तस्करी अशक्य आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक अमरावतीमध्ये पार पडली त्यावेळी नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. पटोले म्हणाले की, अंमली पदार्थांचा तस्‍कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून फरार करण्यात कोणी मदत केली हे समोर येत आहे. ललित पाटील बेपत्‍ता कसा झाला ? त्याला सोडवण्याचा कोण प्रयत्न करीत आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, योग्य वेळी ती आम्ही जाहीर करू, परंतु तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये.

हेही वाचा : राज्यकर्त्यांना ‘ग्रीन मोझॅक’ची लागण! सोयाबीनवरील ‘यलो मोझॅक’कडे दुर्लक्ष; वंचितची टीका

काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढत असून जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवणे याला प्राधान्य दिले जाणार आहे. उदयपूर शिबिरातील निर्णयांची अंमलबजावणी कितीपत झाली याचाही आढावा घेतला जात आहे. जागा वाटपाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षाने जागा लढवावी अशी मागणी करत असतात ते योग्यच आहे, पण गुणवत्‍तेच्‍या आधारावर जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळेल यापेक्षा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे. लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या भाजपाला सत्तेबाहेर काढणे हेच आमचे काम आहे, असे पटोले म्‍हणाले.

हेही वाचा : नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वीज अपघात टाळायचे, तर हे वाचाच…

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहेत, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेला लुटले होते, पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत. सरकार मधले लोक गुजरातचे हस्तक आहेत हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. अमरावतीच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार यशोमती ठाकूर, माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार बळवंत वानखेडे, जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अमरावतीचे प्रभारी नाना गावंडे आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati congress state president nana patole says dont make maharashtra udta punjab mma 73 css