अमरावती : मीटरमध्ये फेरफार करून किंवा उघड्या वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांचा अमरावती शहरात उपद्रव वाढू लागल्यानंतर महावितरणने त्यांच्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षांत शहरात वीज चोरीची ८८२ प्रकरणे उघडकीस आली असून त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ४४ लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात महावितरणला यश आले आहे.
वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी ३ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तडजोड शुल्क भरून वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या ५३ प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली आहे. वीजचोरी पकडण्यासाठी महावितरण सातत्याने वीजचोरी विरोधात मोहीम राबविते. या मोहिमेदरम्यान शहरात एप्रिल-२०२२ ते एप्रिल-२०२३ या १३ महिन्यांत ८८२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात मीटरमध्ये फेरफार करणे, मीटर बंद पाडणे, मीटर दुरून बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करणे, मीटरमध्ये रोध निर्माण करून मीटर बंद पाडणे किंवा मीटरची गती संथ करणे असे प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.
या सर्व ग्राहकांना ३ कोटी १७ लाख रुपये वीजचोरीची बिले देण्यात आली आहेत. त्यापैकी ६९० वीज चोरी प्रकरणात तडजोड शुल्कासह २ कोटी ४४ लाखाची वीजबिले भरण्यात आली आहेत. परंतु अजूनही दंडासहीत वीजचोरीची रक्कम न भरणाऱ्या ५३ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत,तर १३९ प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे विद्युत वाहकावर, रोहित्रावर त्याच्या मर्यादेच्या पलीकडे भार पडतो, परिणामी रोहित्रात बिघाड होतो. शॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्याचा नाहक त्रास नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांवर होतो व महावितरणलाही त्याचा मोठा आर्थिक फटका होतो. याशिवाय वीज पुरवठा खंडित झाल्यावर महावितरणला ग्राहकाच्या रोषाला सामोरे जावे लागते. वीज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणकडून यापुढे सतत आणि अधिक तीव्रपणे मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयाच्या पथकासोबत महावितरणच्या भरारी पथकाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.