अमरावती : कुठल्याही कारणावरून सार्वजनिक ठिकाणी बाचाबाची आणि त्याचे रुपांतर हाणामारी होण्याच्या घटना नवीन नाहीत. अनेकदा क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला जातो. कुणीही वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. पण, आज अनेकांच्या हाती आलेल्या मोबाईलमध्ये या गोष्टी चित्रित केल्या जातात आणि त्या लगेच समाज माध्यमांवर प्रसारित होतात.
अशाच प्रकारची एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बसस्थानक परिसरात घडली. या ठिकाणी चार महिला आणि तरुणींमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या घटनेची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दोन महिला आणि दोन तरुणींमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद होतो आणि त्याचे रुपांतर लगेच हाणामारीत होते. एक तरुणी साडी परिधान केलेल्या महिलेचे केस धरून तिला ओढत नेते. या महिलांमध्ये चांगलीच हाणामारी होते. या महिलांनी एकमेकींना जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. मोर्शीच्या बसस्थानकावरील हा प्रकार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा… निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट…
चौघी जणी एकमेकींचे केस ओढताना पाहून या ठिकाणी चांगलीच गर्दी झाली होती. काही बघ्यांनी या हाणामारी करणाऱ्या महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही जुमानत नव्हत्या. अखेरीस काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्ती करत हे प्रकरण सोडवले. या प्रकरणाची चांगलीच चर्चा परिसरात रंगली आहे. या हाणामारीचे चित्रिकरण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये केले, ते सध्या समाज माध्यमांवर चांगलेच गाजत आहे. या घटनेची तक्रार अद्याप पोलिसांपर्यंत गेली नसल्याचे सांगण्यात आले. हाणामारी होत असताना अनेक बघे शेरेबाजी करीत आहेत, पण त्या महिलांना रोखण्याची हिंमत सुरुवातीला कुणीही करीत नाही, पण नंतर काही महिला धाडस दाखवून समोर येतात. काही वयोवृद्ध लोक या महिलांचे भांडण सोडवतात, हे व्हीडिओमध्ये दिसत आहे.
हे ही वाचा… राज्यभरात कुत्रे, मांजर, माकडांमुळे नागरिक त्रस्त… चावा घेतल्याने…
एसटी बस, रेल्वेच्या सामान्य डब्यांमध्ये जागेवरून नेहमी भांडणे पहायला मिळतात. सध्या महिलांना एसटी प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत असल्यामुळे बस प्रवासासाठी महिलांची पसंती दिसून आली आहे. महिलांची गर्दी देखील वाढली आहे. त्यातच जागा पटकावण्यासाठी चढाओढ लागलेली असते. अनेक जण आसनांवर रुमाल टाकून जागा आरक्षित करू पाहतात, त्यावरूनही वाद होतात. या महिलांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद निर्माण झाला, हे समजलेले नसले, तरी हाणामारीचा हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.