अमरावती : पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नजरेत भरणारा हिरवागार मेळघाटचा परिसर उन्हाळ्याच्या आगमनात पानगळीमुळे रुक्ष आणि उजाड वाटायला लागतो, पण निसर्गाने रखरखत्या उन्हातही लाल, जांभळ्या, पिवळ्या, गुलाबी अशा विविधरंगी फुलांचे आगळे-वेगळे सौंदर्य मेळघाटच्या ओंजळीत टाकले आहे. अनेक वृक्षांवरील ही रंगीबेरंगी फुले पर्यटकांना आनंद देत आहेत.
वसंत ऋतू हा चकचकीत, तजेलदार हिरव्यागार पालवीबरोबर अनेक वृक्षवेलींच्या फुलण्याचा, बहरण्याचा काळ असतो. जंगलात, टेकड्या-डोंगरांवर आणि नदी-नाल्यांच्या आसपास भ्रमंती करणाऱ्या निसर्गप्रेमींना आपल्या लावण्याने मोहून टाकणारे, उन्हाळ्यात फुलणारे-फळणारे असंख्य जातीचे देशी वृक्ष दिसतात.
लाल फुलांचे अशोक आणि रानपांगारा उन्हाळ्यातही फुलत राहणारे, सौंदर्याची परिसीमा गाठणारे देखणे वृक्ष आहेत. करंज, वृक्षाची चमकदार पर्णशोभा आणि गुलाबी फुलांचे तुरे मे महिन्यात पाहातच राहावेसे वाटणारे. जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेले गुलमोहर मेळघाटात अनेक ठिकाणी आढळते. उन्हाळ्यात सुंदर हिरवीपोपटी नाजूक पालवी नयनमोहर दिसते. लाल, किरमिजी किंवा नारिंगी रंगाच्या अतिसुंदर फुलोऱ्यांनी पानांशी साधलेली विरोधी रंगसंगती डोळयाचे पारणे फेडणारी असते. तलवारीच्या आकाराच्या काही शेंगाही झाडावर दिसतात.
सुंदर पांढऱ्या रंगाची फुल असणाऱ्या साजडची पानगळ झाली असली तरी लाल, पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी अशा अनेक रंगाचे मिश्रण आणि त्यासोबतच सुवासिक सुगंधासह मेळघाटात कुंभीची सुंदर फुलेदेखील निसर्गप्रेमींसह पर्यटकांना मोहित करणारी आहेत. जांभळ्या रंगाची करवी, गडद लाल रंग असणारी पांगराची फुले, लाल रंगाची शाल्मली आणि पळसाची सुंदर अशी लाल फुलेदेखील डोळ्यात भरणारी आहेत.
मेळघाटच्या अंगाखांद्यांवर सर्वत्र आढळणारा बहावा सोन्याच्या दागिन्यांनी नखशिखान्त नटलेला, अंगाखांद्यावरून सोनपिवळ्या पुष्पमाला दागिन्यांसारख्या मिरवणाऱ्या बहाव्याचे पिवळीधम्मक अस्तित्व पर्यटकांना खुणावते. बहाव्याचे लाकूडही छान असते आणि शेंगा औषधी असतात.
काटेसावर हा वृक्ष देखील मेळघाटात बहरला आहे. त्याच्या फुलांकडे बुलबुल, हळदे, कोतवाल अशा विविध प्रकारचे पक्षी फुलातील मधुरस, कळ्या आणि फुले खाण्यासाठी आकर्षित होतात. वटवाघे, खार यांचे हे आवडते झाड आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घनदाट असणाऱ्या हिरव्यागार जंगलात मधमाशा, फुलपाखरु आणि कीटकांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध असते. मात्र उन्हाळ्यात पर्णहीन झाडांच्या जंगलात मधमाशा, फुलपाखरे आणि कीटकांना खाद्य उपलब्ध व्हावे यासाठीच निसर्गाने उन्हाळ्यातदेखील या जंगलांमध्ये विविधरंगी फुलांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती निसर्ग अभ्यासक आणि लेखक प्र.सु. हिरूरकर यांनी दिली.