अमरावती : स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, जिल्ह्याचे वैभव असलेली ही विहीर अजूनही दुर्लक्षितच आहे. पुरातत्‍व विभागाच्‍या लेखी राज्‍य संरक्षित स्‍मारक म्‍हणून या विहिरीची नोंद असली, तरी विहिरीच्‍या संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्‍यात आले आहे. पर्यटन वाढीच्‍या दृष्‍टीनेही काहीच प्रयत्‍न झालेले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावतीहून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावर महिमापूर हे गाव आहे. याच गावात ही ऐतिहासिक विहीर आहे. संपूर्ण दगडाचे बांधकाम. चौकोनी आकार. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती, अशी या विहिरीची रचना आहे.

हेही वाचा… गडचिरोली : मेडिगड्डा धरणग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाचा उपमुख्यमंत्र्यांना विसर! ३४ दिवसांनंतरही शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

हेही वाचा… बुलढाणा : बोरी अडगाव येथे सशस्त्र दरोडा! चोरट्यांच्या हल्ल्यात महिलांसह चौघे जखमी

ही वि‍हीर मुघलकालीन असल्‍याचा उल्‍लेख अमरावती जिल्‍ह्याच्‍या ‘गॅझेटियर’मध्‍ये आहे. जमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती. पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. पाहणाऱ्याला ही विहीर असल्याचे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. ते प्रमुख वैशिष्ट्यही होते. वरील दोन मजले पडल्यामुळे आता विहिरीच्या आतील बांधकाम वरून बघता येते. या विहिरीच्या आत आजदेखील कपाऱ्यांसमान भासणारी गूढ रचना आहे. विहिरीचा उद्देश वाटसरूंसाठी निवारा आणि पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था हाच होता, असे सांगितले जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati district wonder of architecture and historical footwell of mahimapur is neglected mma 73 asj