अमरावती : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना आतापर्यंत केवळ ५० टक्क्यांपर्यंतच पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार ३६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश असले, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे पंचनामे रखडले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरिपातील तूर व कापसासह रब्बीतील गहू, हरभरा, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे, यासोबतच या पावसाचा पानपिंपरी व संत्र्यासह केळी या फळबागांनाही फटका बसला आहे. महसूल प्रशासनाने नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात २८ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचे म्हटले होते. जिल्ह्यातील तीनच तालुक्यात नुकसान झाल्याचा महसूल प्रशासनाचा प्राथमिक अहवाल होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १४ तालुक्यातून तक्रारी येऊ लागल्याने कृषी विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३६० हेक्टर मध्ये नुकसान झाल्याचे समोर आले. हा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनास पाठवून संयुक्त पंचनाम्यासाठी विनंतीही केली. झालेल्या एकूण नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी आतापर्यंत ८७,१०० हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.
अद्यापही ७९ हजार २६० हेक्टर मधील पंचनामे होणे शिल्लक आहेत. जिल्ह्यात ९१ हजार ३७० हेक्टरवरील कपाशीचे, ३४ हजार ९४६ हेक्टरमधील तूर पिकाचे, ५० हेक्टरवरील कांदा, ४० हेक्टरवरील पान पिंपरी, ९ हजार ८७९ हेक्टरमधील हरभरा, ५१५ हेक्टरमधील गहू पिकाचे तसेच २८ हजार २०० हेक्टरमधील संत्री बागांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पूर्वी शेतशिवार कापसाने पांढरे झाले होते, परंतु मजुरांअभावी कापसाचा वेचा थांबला होता. त्यातच अवकाळी पावसामुळे कापूस भिजल्याने पांढरे सोने मातीमोल झाले. तुरीच्या पिकाला आलेला बहराचा सोसाट्याचा वाऱ्यामुळे शेतात सडा पडला.
हेही वाचा : नागपूर : रेशीमबागेतील स्मृती मंदिर भेटीला अजित पवार गटाची दांडी
संयुक्त पंचनामे करण्यासाठी तहसील पातळीवरून मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र तहसीलदार यांच्यासह तलाठी या कामात सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत, या कामात त्यांना स्वारस्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी तलाठ्यांच्या व नंतर तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या संपामुळे पंचनामे रखडले होते. राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला पंधरवडा उलटला आहे. नुकसानग्रस्तांना राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निकषानुसार हेक्टरी मदत देण्याचे सरकारचे आश्वासन आहे. मात्र पंचनामे रखडले असल्याने नुकसानीचे अंतिम अहवाल कधी सादर होणार व मदत कधी शेतकऱ्यांना मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.