अमरावती : मुलीने चार वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला. या विवाहाला मुलीच्या वडिलांचा विरोध होता. त्याच रागातून ५० हजार रुपये सुपारी देऊन मुलीच्या वडिलांनी तिघांच्या माध्यमातून जावयावर जीवघेणा हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. ही घटना चांदूर बाजार येथे उघडकीस आली. या प्रकरणी जावयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्ला चढवणाऱ्या दोघांसह सुपारी देणाऱ्या सासऱ्याला अटक केली आहे.
नितीन (३८) असे तक्रारदार जावयाचे नाव आहे. या प्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी अक्षय राजेश वानखडे (३०, रा. कठोरा, अमरावती), मो. तनवीर शेख आबिद (३१) या दोघांसह सुपारी देणाऱ्या ५५ वर्षीय सासऱ्याला अटक केली आहे. चार वर्षांपूर्वी नितीनने आंतरजातीय विवाह केला आहे. दरम्यान या लग्नाला नितीनच्या सासऱ्यांचा विरोध होता. याच रागातून नितीनच्या सासऱ्यांनी अक्षय वानखडे याला ५० हजार रुपये सुपारी देऊन नितीनला मारण्यासाठी सांगितले होते. नितीन चांदूर बाजार येथे एका चौकात उभा असताना अक्षय दूरबार त्याच्या दोन सहकाऱ्यांसह त्याला मारण्यासाठी पोहोचला. यावेळी चाकू व लोखंडी सळाखीने नितीनवर हल्ला चढवण्यात आला मात्र नितीनने चाकूचे वार चुकवले आणि जीव वाचवत पळ काढला.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा गडचिरोलीत ‘मॉर्निंग वॉक’, महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत भयमुक्त गडचिरोलीचा नारा
त्यावेळी नागरिक व पोलिसांनी अक्षय व मो. तनवीर शेख आबिद या दोघांना पळून जात असताना पकडले. त्या दोघांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना ५० हजार रुपयांत ही सुपारी नितीनच्या सासऱ्यानेच दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कट रचने, प्राणघातक हल्ला करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान १ एप्रिल २०२३ ला सुद्धा नितीनवर त्याच्या सासऱ्याने सुपारी देऊन अन्य मारेकऱ्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.