अमरावती : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागपूर येथे परत जात असलेल्या नागरिकांच्या खासगी प्रवासी मिनीबसवर बोलेरोमधून आलेल्या अज्ञात हल्लखोरांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहे. ही थरारक घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवणगाव नजीक घडली. हल्ल्याचे कारण मात्र कळू शकलेले नाही.
नागपूर येथील भाविक पर्यटक एमएच १४ / जीडी ६९५५ क्रमांकाच्या १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलरमधून रविवारी शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ते शेगावहून परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांचे वाहन अमरावतीहून नागपूरकडे जात असताना शिवणगाव ते टोलनाक्याच्या दरम्यान नागपूर येथून येत असलेल्या एका बोलेरो वाहनाने वळण घेऊन पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही वेळाने बोलेरो वाहन समोर गेले आणि या वाहनातील हल्लखोरांनी टेम्पो ट्रॅव्हलरवर गोळीबार सुरू केला. यात एक गोळी चालक खोमदेव कवडे यांच्या हाताला स्पर्श करून गेल्याने ते जखमी झाले. चालकासह इतर चार जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : महिला प्राध्यापक आता ‘शेरणी’वर होणार स्वार!
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी पुन्हा आपले वाहन वळवून मोर्शीच्या दिशेने त्यांनी पलायन केले. टेम्पो ट्रॅव्हलरच्या जखमी चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्यात कुठेही न थांबवता थेट तिवसा पोलीस ठाण्यात आणले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेले आणि लगेच नियंत्रण कक्षाला कळवले. हल्लेखोर हे बोलेरो वाहनातून आले होते आणि त्यांनी तोंडाला दुपट्टे बांधलेले होते, अशी माहिती वाहनातील पर्यटकांनी दिली. या हल्ल्यामागे लुटमारीचा हेतू होता की अन्य कोणते कारण याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.