अमरावती : अमरावतीच्या जागेवरून महायुतीतील पेचप्रसंग सुटण्याची चिन्हे दिसत नसून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही, असा दावा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते व माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीच्या वेळी महायुतीतील घटक पक्षांसोबत समन्वय ठेवून सौजन्याने वागण्याऐवजी आमदार रवी राणा यांचा सूर धमकीचा असतो, यावरून आजही त्यांच्यात पैशांची गुर्मी आणि आम्ही कुणालाही खरेदी करू शकतो, असा अविर्भाव आहे. पण, आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. रवी राणा यांचा बालीशपणा, अपरिपक्वता, आततायीपणा हा त्यांच्याचसाठी घातक आणि मारक ठरणार आहे.
हेही वाचा : बुलढाणा: काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे… ‘हे’ आहे कारण…
सर्व घटक पक्षांना मंचावर आणून नवनीत राणा यांचा प्रचार करण्यास भाग पाडू, असे वक्तव्य रवी राणा यांनी काही दिवसांपुर्वी केले होते, त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची गुरूवारी मुंबईत भेट घेतली. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ हेही उपस्थित होते. रवी राणा यांच्या वागणुकीमुळे भाजपसह इतर सर्व सहकारी दुखावलेले आहेत. त्यांच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध असल्याचे आपण त्यांना सांगितले. सुमारे दीड तास सकारात्मक चर्चा झाली. नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यालयाचाही निकाल लवकरच अपेक्षित आहे. तोही नवनीत राणा यांच्या विरोधात जाणार आहे. अशा परिस्थितीत नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यास देशभरातील मागासवर्गीयांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि भाजपची बदनामी होईल, हे आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे, असे अडसूळ म्हणाले.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा जाहीर करणे हे आघाडीसाठी अडचणीचे…” नाना पटोले स्पष्टच बोलले
भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे देखील रवी राणा यांच्या वागणुकीवर नाराज आहेत. त्यामुळे भाजप विचारपूर्वक निर्णय घेईल, असा दावा अडसूळ यांनी केला.