अमरावती : ‘ऑनलाइन पार्ट टाईम ऑफर’ च्या नावावर एका ४३ वर्षीय व्यक्तीची ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील हर्षराज कॉलनी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी एका कंपनीच्या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हर्षराज कॉलनी येथील नितीन भोकसे (४३) यांना टेलिग्रामवर ‘ऑनलाइन पार्ट टाईम ऑफर’ आली. त्यानुसार काही रक्कम गुंतविल्यास त्यावर ३० ते ४० टक्के परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर इन्फोएज टेक्नॉलॉजी कंपनीचे नाव सांगून विविध प्रलोभने देत त्यांच्याकडून ८७ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर त्यांना विविध कारणे सांगून आणखी १ लाख २६ हजार २२० रुपयांची मागणी करण्यात आली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नितीन भोकसे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. १४ ते २४ मे दरम्यान भोकसे यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.