अमरावती : एकलविहीर येथील महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात वरूड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाला यश आले. पत्नी वारंवार अपमान करीत असल्याने पतीनेच तिची कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. शालीकराम धुर्वे (५५) रा. एकलविहीर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे तर नीला धुर्वे (५२) रा. एकलविहीर असे मृत महिलेचे नाव आहे. नीला धुर्वे या मंगळवार, ९ जुलै रोजी सायंकाळी गुरे चारण्याकरिता गावालगतच्या जंगलात गेल्या होत्या. परंतु, रात्री घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांसह गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा पत्ता लागला नव्हता. दरम्यान, बुधवार, १० जुलै रोजी सकाळी ८ वाजता नीला यांचा मृतदेह जंगलातील नाल्यात आढळून आला होता. मृतदेहाची पाहणी केल्यावर धारदार शस्त्राने गळा चिरुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मृत नीला यांचा मुलगा शेखर याच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सदरचा गुन्हा उघड करुन आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासासाठी वरूड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
हेही वाचा : ‘लाडकी बहीण’साठी आता वेब पोर्टल, अर्ज करणे…
तपासात नीला व त्यांचे पती शालीकराम यांचे पटत नसून घटनेच्या एक दिवसापूर्वी त्यांच्यात पैशांच्या कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले होते, अशी माहिती समोर आली. त्या आधारावर पथकाने शालीकरामची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने पत्नी नीला हिच्यासोबत पटत नसल्याने व ती नेहमी आपला अपमान करून शिवीगाळ करीत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. मंगळवार, ९ जुलै रोजी सायंकाळी गुरे चारण्याकरिता नीला आपल्याला मदत करण्यासाठी आल्यावर आपण प्रथम तिचा गळा आवळला. ती बेशुद्ध झाल्यावर आपण कुऱ्हाडीने तिचा गळा चिरुन हत्या केली. हत्येनंतर पत्नी दिसत नसल्याचा बनाव करून गावातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे शालीकरामने चौकशीत सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, वरूडचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार व नितीन इंगोले, राजू मडावी, गजेंद्र ठाकरे, सचिन मिश्रा, बळवंत दाभणे, शकील चव्हाण, रवींद्र बावणे, भूषण पेटे, पंकज फाटे, राजू चव्हाण, मंगेश मानमोडे यांनी केली.