अमरावती : जात पंचायतीचा आदेश न पाळल्याने पती-पत्नीसह दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीतील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दीपक पांडुरंग पवार, सुधाकर पवार, देवेंद्र सूर्यवंशी, धनराज पवार, शैलेश पवार, मनीष सूर्यवंशी सर्व रा. विलासनगर, अमरावती, किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार, खेमराज सोळंके तिघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा व देवा पवार रा. तिवसा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सविता (काल्पनिक नाव) या तक्रारदार महिलेचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. महिलेला दुसरा मुलगा झाला, तेव्हा सविता माहेरी आईकडे होती. त्यावेळी करूणा (काल्पनिक नाव) त्यांच्याकडे आली. मी तुझ्या नवऱ्यापासून गर्भवती आहे. मला तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचे आहे, आता तर तुझ्या नवऱ्याला मला घरात घ्यावेच लागेल, असे करूणा तिला म्हणाली.
हेही वाचा : Tiger Deaths : राज्यात १० दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी…
करूणा हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सविता हिच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत सविताने आपल्या पतीला विचारपूस केली. आपले लग्नापूर्वी करूणासोबत प्रेमसंबंध होते. त्यावेळी तिला लग्नाबाबत विचारले होते. मात्र, तिने लग्न केले नाही, असे सविताच्या पतीने तिला सांगितले. दरम्यान, करूणा हिने विलासनगर येथील संबंधित जात पंचायतीमध्ये सविताच्या पतीविरुद्ध तक्रार केली. त्यावर पंचायतने सविता व तिच्या पतीला बोलावून घेतले. करूणासोबत लग्न कर, असा आदेश यावेळी सविताच्या पतीला देण्यात आला. त्यावर त्यांनी नकार दिला. त्यामुळे जात पंचायतमध्ये असलेल्या संबंधित दहा जणांनी सविता, त्यांचे पती व त्यांच्या दोन मुलांना समाजामधून बाहेर काढल्याचा निर्णय दिला. समाजातील कुणी व्यक्ती सविता किंवा त्यांच्या कुटुंबाशी बोलल्याचे आढळल्यास त्यांनासुद्धा समाजाबाहेर काढून टाकले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तेव्हापासून आपल्यासह पती व दोन मुलांवर समाजासह नातेवाइकांनीसुद्धा बहिष्कार टाकल्याची तक्रार सविताने गाडगेनगर ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जातपंचायतींच्या दहशतीमुळे अनेक कुटुंबांना वाळीत टाकण्याचे घडणारे प्रकार माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. आदेश न पाळल्याने नागरिकांचा जातपंचायतींकडून पद्धतशीर छळ केला जातो. असाच हा प्रकार आहे.