अमरावती : नैऋत्‍य मोसमी पाऊस अकोला, पुसद येथे पोहोचल्‍याची घोषणा हवामान खात्‍याने केली आहे. पुढील ४८ तासांत मोसमी पाऊस दक्षिण छत्‍तीसगड आणि तेलंगणाच्‍या उर्वरित भागात दाखल होणार असला, तरी विदर्भातील उर्वरित भागात मोसमी पाऊस सक्रीय होण्‍यास अजून अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही, अशी माहिती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्‍त्रज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात मोसमी पाऊस सक्रीय होण्‍याची वाट पाहली जात आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. पण, अजूनही मोसमी पाऊस पोहोचलेला नाही. पुढील तीन दिवसांत अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, आणि अकोला जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. येत्‍या १४ ते १७ जून दरम्‍यान विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर १८ ते २० जून दरम्‍यान मध्य भारतात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्‍याचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काय आहे विदर्भ कनेक्शन ?

मोसमी पावसाची केवळ अरबी समुद्रीय शाखाच कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढे सरकत आहे. बंगाल उपसागरीय शाखा अजूनही जागेवरच असल्यामुळे मोसमी पाऊस संपूर्ण विदर्भ व उर्वरित मराठवाड्यात वेगाने झेपावण्यास काहीशी अडचण जाणवत असल्‍याचे भारतीय हवामान शास्‍त्र विभागाचे निवृत्‍त हवामानतज्‍ज्ञ माणिकराव खुळे यांचे म्‍हणणे आहे.

संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात वळीव पूर्व मोसमी व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात बुधवार १२ जून पर्यंत मध्यम मोसमी पावसाची शक्यता जाणवते. मराठवाडा परिसरातील ९०० मीटर उंचीपर्यंतची चक्रीय वाऱ्याची स्थिती मोसमी पाऊस व त्याच्या प्रगतीसाठी पूरक जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यांत १५ जूनपर्यन्त जोरदार ते अती जोरदार तर खान्देशसह नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत गुरुवार १३ जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. दोन दिवसांत खान्देशात वळीव पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यताही नाकारता येत नाही, असे माणिकराव खुळे यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा : प्रफुल्ल पटेलांना पटोलेंचा पुन्हा ‘दे धक्का’!

विदर्भात चांगल्‍या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पूर्वमोसमी पावसाने देखील वैदर्भियांची निराशा केली. हवामान विभागाने विदर्भात हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. आकाश ढगांनी व्‍यापलेले असते. पण, पाऊस पडत नाही. अनेक‍ भागात पावसाच्‍या सरी कोसळल्‍या, पण त्‍यामुळे दिलासा मिळण्‍याऐवजी दुपारच्‍या कडक उन्‍हामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati imd announce that monsoon rain arrived in akola and pusad mma 73 css