अमरावती : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्‍यक्‍तीची तब्बल ३१ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारकर्त्या व्यक्तीला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला फेसबुकवर एक पोस्ट निदर्शनास आली. त्यात ऑनलाइन ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याची जाहिरात होती. त्यानंतर एका अज्ञात व्हॉट्सॲप वापरकर्त्‍याने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानेसुद्धा तक्रारकर्त्या व्यक्तीला ऑनलाइन ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. ठकसेनाने त्यांना अमेरिकेतील शिकागो येथील एका आंतरराष्ट्रिय कमर्शियल मॅनेजमेंट कंपनीची वेबसाईट पाठविली.

हेही वाचा : चंद्रपूर : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

त्यांना त्या संकेतस्थळाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. ऑनलाइन ट्रेडिंग सुरू झाल्यावर ठकसेनाने त्यांना आभासी फायदा दाखवला. त्यामुळे तक्रारकर्तेदेखील त्या मोहात अडकले. त्यानंतर ठकसेनाने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून सव्वा महिन्याच्या कालावधीत तब्बल ३१ लाख ९० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून एका व्हॉट्सॲप वापरकर्त्‍यासह संकेतस्थळधारकाविरुद्धही फसवणुकीसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati man cheated for rupees 31 lakhs 90 thousand with the lure of online trading mma 73 css