अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने अमरावतीत आयोजित महायुतीच्या बैठकीत प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मत जाणून घेतले पाहिजे, नेत्यांना सन्मान दिला पाहिजे. एका मंचावर आले पाहिजे, असा सूर या बैठकीत उमटला.
येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित महायुतीच्या बैठकीला भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण पोटे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे संजय खोडके, सुरेखा ठाकरे, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ, अरूण पडोळे, संतोष बद्रे, भाजपचे शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, किरण पातूरकर, अॅड. प्रशांत देशपांडे, रिपाइं रामदास आठवले गटाचे प्रकाश बन्सोड, जोगेंद्र कवाडे गटाचे चरणदास इंगोले आदी उपस्थित होते. या बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी आधीच जाहीर केले होते. मात्र, प्रहारचे मुन्ना वसू आणि बंटी रामटेके यांनी प्रहारची भूमिका मांडली.
हेही वाचा : धक्कादायक! महिलेची गुजरातमध्ये विक्री; ३६ दिवस बलात्कार
महायुतीत अकरा घटक पक्ष आहेत. पण, जिल्ह्यातील घटक पक्षांची एकमेकांमध्ये चर्चा होत नाही. विविध पक्षांमध्ये राजकीय संघर्ष लपून राहिलेला नाही, पण महायुती म्हणून एकोपा आवश्यक आहे, असे संजय खोडके म्हणाले. भाजपमधील विविध गटांनी आधी एकत्रित यावे, असा सल्ला संजय खोडके यांनी दिला. आमदार बच्चू कडू यांची महायुतीत महत्वाची भूमिका आहे. त्यांचे मत विचारात घेतले पाहिजे, असेही संजय खोडके म्हणाले.
आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार विसरले. शिवसेनेचे पाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. अनेक काँग्रेस नेते पक्षबदलाच्या तयारीत असून अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ९० टक्के काँग्रेस रिकामी होणार आहे आणि शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेच शिल्लक राहणार आहेत, असा दावा रवी राणा यांनी केला. गतकाळात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो, असे राणा म्हणाले.
हेही वाचा : दिल्ली व गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे रोखणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा
माजी आमदार अभिजीत अडसूळ म्हणाले की, आनंदराव अडसूळ यांनी दोन वेळा अमरावती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा प्रदर्शित करणे चुकीचे नाही. महायुतीत समन्वय राखला गेला पाहिजे. बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांचे नाराजीचे कारण समजून घेतले पाहिजे, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.