अमरावती : पुढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी सहभागी व्हावे, तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे अशी विनंती आहे, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे. युवा स्वाभिमान पक्षातर्फे रवी राणा यांच्या पुढाकाराने मंगळवारी मालखेड मार्गावरील हनुमान गढी येथे मकर संक्रांति निमित्त पतंग उत्सव ते आयोजन करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी पत्रकारांशी बोलताना रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत. पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्यात नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असेही आमदार रवी राणा यांनी सांगितले.

हेही वाचा : टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असे विधान फडणवीसांनी केले होते. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा : अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…

विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन

राजकारणात लोकांनी दिलेला निर्णय स्वीकारला पाहिजे. अचलपूरमधून मतदारांनी भाजपचे प्रवीण तायडे हे सक्षम आमदार निवडले आहेत. प्रवीण तायडे मतदारसंघात जी काही विकासकामे करतील त्यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला पाहिजे, अशी आशा रवी राणा यांनी व्यक्त केली. लोकशाहीत पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून सगळ्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांनी तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे, विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही रवी राणा यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना केले आहे. रवी राणा यांनी याआधी बच्चू कडू यांनी चहा पिण्यासाठी यावे, असे आमंत्रण देखील दिले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati mla ravi rana said uddhav thackeray devendra fadnavis will be together on next makar sankranti mma 73 css