अमरावती : महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्‍या दोन दिवसांच्‍या अमरावती दौऱ्यावर असून पश्चिम विदर्भातील पाच जिल्‍ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्‍यांनी उमेदवारांविषयी चाचपणी केली. उद्या ते पूर्व विदर्भातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्‍यान, इच्‍छुकांचे लक्ष उमेदवारांच्‍या यादीकडे लागले आहे. राज ठाकरे यांचा दोन दिवस अमरावतीत मुक्काम असून यादरम्यान ते मतदारसंघांचा आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेत आहेत. शुक्रवारी पहील्या दिवशी त्यांनी पश्चिम विदर्भातील एकोणतीस मतदारसंघांचा आढावा घेतला. प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्‍यांनी चर्चा केली. महिला पदाधिकाऱ्यांची त्‍यांनी स्‍वतंत्रपणे बैठक घेऊन त्‍यांची मते जाणून घेतली.

गेल्‍या महिन्‍यात विदर्भ दौऱ्याच्‍या वेळी राज ठाकरे यांनी तीन उमेदवारांच्‍या नावांची घोषणा केली होती. आतापर्यंत ७ उमेदवारांची नावे जाहीर करण्‍यात आल्‍याने यावेळी अमरावतीतून काही उमेदवारांची नावे जाहीर होतील का, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असले, तरी लगेच नावांची घोषणा होण्‍याची शक्‍यता नसल्‍याचे मनसेच्‍या पदाधिकाऱ्याने सांगितले. अद्याप महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप ठरलेले नसल्याने मनसे उमेदवार जाहीर करण्याची घाई करणार नाही असे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्‍हणणे आहे. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार संघनिहाय स्थिती जाणून घेण्यात येत असल्याचे स्पष्ट करतानाच आताच उमेदवारांची नावे जाहीर होणार नसल्याचे सांगण्‍यात आले आहे.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण उद्योग विभागात! उद्योगमंत्री म्हणतात…

शुक्रवारी सकाळी रेल्वेने राज ठाकरे यांचे अमरावती रेल्वे स्थानकावर आगमन झाले. येथील इर्विन चैाकात त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यानंतर दुपारी जिल्हानिहाय आढावा बैठकीस प्रारंभ झाला. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम या जिल्ह्यातील केवळ निमंत्रित पदाधिकाऱ्यांनाच या बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. यामधे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालूकाध्यक्ष व उपाध्यक्ष व इच्छूक उमेदवारांचा समावेश होता. यावेळी राज ठाकरे यांच्यासह अनिल शितोळे, आनंद एंबडवार व राजू उंबरकर उपस्थित होते. आढावा बैठकीत प्रत्येक मतदार संघाची राजकीय स्थिती, जातीय समिकरणं, पक्षीय बलाबल, गेल्‍या निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवारांची मतांची आकडेवारी अशी माहीती घेण्यात आली. उद्या पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : अकोला: शीतपेयात गुंगीचे औषध टाकून मुलीवर सामूहिक अत्याचार

मनसे व्यतिरिक्त अन्य पक्षातील असंतूष्ट इच्छूक उमेदवारांवर विशेष लक्ष ठेवण्‍यात येत असून काही असंतूष्टांनी त्यांची भेटही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या असंतूष्टांना उमेदवारी दिल्यास काय स्थिती राहू शकेल याचा अंदाज घेण्यात येत आहे.