अमरावती : उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमावाने शुक्रवारी रात्री उशिरा नागपुरी गेट पोलीस ठाण्‍यात धडक दिली. यावेळी संतप्त जमावाने परिसरात दगडफेक केली. जमावाला पांगवण्‍यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंदिराच्‍या विश्‍वस्‍ताने आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याचा आरोप असून, त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी नागपुरी गेट पोलीस ठाण्‍यात निवेदन देण्‍यासाठी आलेल्‍या विशिष्‍ट समुदायाच्‍या जमावाने केली होती. पोलिसांसोबत चर्चा करीत असतानाच जमावातील काही लोकांनी संतप्‍त झाले व त्यानी पोलीस ठाण्‍याच्‍या बाहेर येऊन दगडफेक सुरू केली, त्‍यामुळे काही वेळातच नागपुरी गेट परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, जमाव ऐकण्‍याच्‍या मन:स्थितीत नव्‍हता. त्‍यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या.

हे ही वाचा…राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका

जमावाने पोलिसांच्‍या वाहनांवर दगडफेक करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यानंतर अतिरिक्‍त पोलीस कुमक मागविण्‍यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्‍याची माहिती मिळताच पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्‍त गणेश शिंदे, सागर पाटील यांच्‍यासह इतर पोलीस अधिकारी आणि अतिरिक्‍त कुमक घटनास्‍थळी पोहचली. त्‍यानंतर शांतता प्रस्‍थापित झाली.

नागपुरी गेट पोलीस ठाण्‍याच्‍या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्‍यात आला आहे. कुणीही जमावाने एकत्र येऊ नये, कुठल्‍याही प्रकारचे शस्‍त्र, लाठी-काठी जवळ बाळगू नये. कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पसरवू नये. पालकांनी आपल्या मुलांना विनाकारण घराबाहेर पाठवू नये व ते कोणत्याही प्रकारच्या असामाजिक तत्वांबरोबर सामाजिक सुव्यवस्था बिघडविण्यासाठी मदत करणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. पोलीस ठाणे परिसरात सध्या शांतता असून ती बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करु नये, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अमरावती शहरातील इतर पोलीस ठाण्‍यांच्‍या हद्दीतील नागरिकांनी दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारच्या असामाजिक कृत्यात सहभागी होऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

हे ही वाचा…‘लाडकी बहीण’ योजनेवरून भाजपचे आशीष देशमुख यांचा अनिल देशमुखावर आरोप..

सध्‍या नागपुरी गेट पोलीस ठाण्‍याच्‍या परिसरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्‍याच्‍या परिसरात धुडगुस घालणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.