अमरावती : नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील गोल्डन फायबर या कंपनीतील सुमारे शंभरावर कामगारांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. या कामगारांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाण्यातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात अनेक महिलांना पाणी पिल्यानंतर उलट्यांचा त्रास होत असल्याचे निदर्शनात आले आहे. मात्र, ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काही महिलांना सकाळी नाष्टा केल्यानंतर मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. या घटनेची माहिती मिळताच गोल्डन फायबर कंपनीच्या व्यवस्थापनाने डॉक्टरांना पाचारण केले. काही महिलांवर कारखान्यातच उपचार करण्यात आले. पण, विषबाधा झालेल्या कामगारांची संख्या अधिक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
नांदगावपेठ येथील वस्त्रोद्योग संकुलात गोल्डन फायबर एएलपी ही कंपनी आहे. या कंपनीत सुमारे सातशे कामगार कामाला आहेत. या कारखान्यात लीनन यार्नचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीत ग्रामीण भागातील कामगार कामाला आहेत. बहुतांश महिला कामगार आहेत. आज सकाळी कंपनीत पोहचल्यानंतर महिला कामगारांनी तेथील पाणी पिल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला, तर काही कामगारांना नाष्टा केल्यानंतर उलट्यांचा त्रास सुरू झाला.
हेही वाचा : जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
व्यवस्थापनाने माहिती दडवली
कंपनीच्या व्यवस्थापनाने इतकी गंभीर घटना घडूनही सुरूवातीला माहिती दडविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मनसेचे नेते पप्पू पाटील यांनी केला आहे. पप्पू पाटील म्हणाले, आम्हाला विषबाधेच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही जेव्हा कारखान्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला सुरूवातीला रोखण्यात आले. व्यवस्थापनाने कारखान्यात डॉक्टरांना बोलावले आणि प्राथमिक उपचार करून कामगारांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही या घटनेची माहिती नांदगावपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कामगारांना रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली. ही घटना गंभीर असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पप्पू पाटील यांनी केली. मोशी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २८ डिसेंबर रोजी शालेय पोषण आहारातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या घटनेत १८ गंभीर विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता ही घटना उघडकीस आली आहे.