अमरावती : आईने आपल्या बारा वर्षीय मुलासह विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील हमालपुरा येथे घडली. या आत्मघाती निर्णयामागील कारण अद्याप समोर आले नसून सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
योगीता गजानन वाघाडे (३५) व अथर्व गजानन वाघाडे (१२) रा. हमालपुरा अशी मृत माय-लेकांची नावे आहेत. योगीता यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. पतीच्या निधनानंतर योगीता ह्या मोलमजुरी करून आपला व मुलाचा उदरनर्विाह चालवित होत्या. मंगळवारी त्यांनी मुलगा अथर्वसह स्वत:ही विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळाने हा धक्कादायक प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला.
हेही वाचा : ऑपरेशन अमानत… २.७८ कोटींचे साहित्य रेल्वे प्रवाशांना मिळाले परत !
त्यांनी तातडीने योगीता व त्यांचा मुलगा अथर्व यांना जल्हिा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीतून राजापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. योगीता यांच्या या आत्मघाती निर्णयामागील कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.