अमरावती : मी माझ्या परीक्षेत नापास झाली, ज्‍यांनी परीक्षेची तयारी केली नाही, ते अनुत्‍तीर्ण झाले, तर ती गोष्‍ट वेगळी असते, पण एक मेरिटचा विद्यार्थी जेव्‍हा फार कमी गुणांमुळे अनुत्‍तीर्ण होतो, ते दु:ख त्‍या मेरिटच्‍या विद्यार्थ्‍यालाच माहित असते, अशा शब्‍दात माजी खासदार नवनीत राणा यांनी येथील एका कार्यक्रमात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील संत ज्ञानेश्‍वर सभागृहात युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या वतीने रविवारी दहावी, बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाविषयी वक्‍तव्‍य केले. नवनीत राणा म्‍हणाल्‍या, मी कुठेतरी कमी पडले, त्‍यामुळे कदाचित माझा पराभव झाला, पण मी त्‍याची तयारी करेन, आणि परत एकदा या मैदानामध्‍ये परत येईल.

हेही वाचा : बुलढाणा : चालकाचे नियंत्रण सुटले अन् भरवेगातील काळी पिवळी थेट खड्ड्यात पडली, दहा प्रवासी गंभीर…

नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर काही काळ त्या सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होत्या. पुन्हा नव्याने तयारीला लागणार आहोत. अमरावतीच्याच मैदानात आपण नक्की उतरणार आहे, असे सांगत या पुढेही राजकारणात सक्रीय राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनीत राणा यांच्या पराभवाला स्थानिक नेते जबाबदार आहेत. नवनीत राणा यांचा पराभव व्हावा यासाठी सगळे नेते एकत्र आले होते. त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला. पण नवनीत राणा यांचा पराभव करून काही राजकीय नेत्यांचे जरी भले झाले असले तरी अमरावती जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे यावेळी आमदार रवी राणा म्हणाले. जिल्ह्याला एक विकासाचे व्हिजन देण्याचे काम नवनीत राणा यांनी केले होते, तेच व्हिजन थांबवले गेले असेही ते म्हणाले. देशात जे काही मोजकेच खासदार चर्चेत होते त्या पैकी एक नवनीत राणा होत्या. त्यांचे नाव देशात होते असेही रवी राणा म्हणाले.

हेही वाचा : चंद्रपूर : महाराष्ट्रातील १८ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित समावेश? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची…

अमरावती जिल्‍ह्याला विकासाच्‍या क्षेत्रात पुढे नेण्‍याचे काम ज्‍या ताकदीने नवनीत राणा करीत होत्‍या, ते काम आता थांबलेले आहे. ते आपण कधीही परत मिळवू शकणार नाही, अशी खंत रवी राणा यांनी व्‍यक्‍त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास कामांचा धडाका, अमरावती मतदार संघातील विकासाचे मुद्दे घेऊन आम्‍ही लोकांसमोर गेलो. पण मोदी विरोधकांनी एकजूट दाखवली, आम्‍ही मोदींविषयी प्रेम व्‍यक्‍त करण्‍यात कमी पडलो. मी भाजपची कार्यकर्ती म्‍हणून अखेरपर्यंत काम करणार आहे. पराभवाचे चिंतन सर्वांनी केले पाहिजे.

हेही वाचा : ६ महिन्यांत १६६ अपघातबळी; अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातांचे…

पराभवाविषयी वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत, पण आपला त्‍यावर विश्‍वास नाही. काय घडले, कसे घडले, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. आम्‍ही समर्पणात कमी पडलो, याची खंत राहील, असे मत नवनीत राणा यांनी काही दिवसांपुर्वी भाजपच्‍या कार्यालयात आयोजित चिंतन बैठकीत बोलताना व्‍यक्‍त केले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati navneet rana on her defeat in lok sabha election 2024 mma 73 css