अमरावती : मराठी नववर्षाची गुढीपाडव्याची पहाट वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील मोसंबी, संत्रा उत्पादकांसाठी संक्रांत घेऊन आली. गारपिटीने मोसंबी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका दिला आहे. वरूड तालुक्यातील वघाळ, वाडेगाव, लोणी परिसर, वंडली, वडाळा, नांदगाव, गाडेगाव, हातुर्णा तसेच मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील शेतशिवारातील संत्री बागांचे तसेच गहू आणि कांदा पिकाचे या गारपिटीने आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.
हेही वाचा : सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
काल रात्री दहाच्या दरम्यान या शेतशिवारात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. आज गुढीपाडव्याच्या पहाटे साडेचार ते साडेपाच दरम्यान बोरा पेक्षा मोठी तर कुठे आवळ्याच्या आकाराएवढी गार पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सद्यस्थितीत मोसंबी व संत्री बागांमध्ये आंबीया बहराची फळे मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मोसंबी व संत्रा बागा बहरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र गारपिटीने शेतकऱ्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहे. या गारपिटीने बागांमधील फळांचे नुकसान झाले आहे. तहसील प्रशासनाला या गारपिटीची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसील प्रशासनाकडे केली आहे. सध्या काढणीवर आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.